ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी कालची रात्र महामार्गावरच काढली. काहीशी थंडी असतानाही शेतकरी रस्त्यावरच झोपून राहिले. या आंदोलनाचा थेट फटका आता मुंबई, पुण्यातील लोकांना बसण्याची दाट शक्यता आहे. नेमकं काय होऊ शकतं पाहूयात...
19 तासांपासून महामार्गावरील वाहतूक बंद
ऊस दराच्या मागणीसाठीच्या शेतकरी आंदोलनामुळे तब्बल 19 तासांपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद आहे. प्रशासनाकडून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली, तरी या मार्गांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, तर...
मुंबई आणि पुण्याला होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या आंदोलनाकडे प्रशासनासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला ऊस दराचा तोडगा न निघाल्यास दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्याचा थेट इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, तर मंत्र्यांची आणि सरकारचीही दिवाळी साजरी होऊ देणार नाही," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
मुख्य मागणी काय?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरमधील किणी टोलनाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरु आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामागची मुख्य मागणी उसाला पहिली उचल प्रतिटन 4500 ते 5000 रुपये दर मिळावा अशी आहे. सध्या कारखानदारांकडून दिला जाणारा 3600 ते 3800 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मंजूर नाही. साखरेची किमान आधारभूत किंमत प्रति किलो 50 ते 60 रुपये करावी, जेणेकरून कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळून ते शेतकऱ्यांना चांगला दर देऊ शकतील, असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
इतर मागण्या काय?
इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचीही या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. सी-हेव्ही मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर 70 रुपये करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. साताऱ्यातील नागठाणे येथील आंदोलनात उसाच्या दरासोबतच ऊर्मोडी धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणीही स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या कर्नाटक सीमा भागात म्हणजेच बेळगावी आणि कोगनोळी टोलनाका येथील आंदोलक शेतकरी प्रतिटन 5500 रुपये दराची आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करत आहेत. या मागण्यांवर प्रशासन, सरकार आणि साखर कारखानदार यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.