उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर येथून मुंबईकडे येत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमध्ये बसले असतानाच हा तांत्रिक बिघाड लक्षात आला. दरम्यान या बिघाडामुळे त्यांच्या मुंबई प्रवासाला उशीर झाला, यानंतर एकनाथ शिंदे कारने मुंबईला रवाना झाले.
एकनाथ शिंदे पंढरपूर येथून मुंबईला येण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले होते. ते हेलिकॉप्टरमध्ये बसलेले असतानाच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आलं. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी तिथे उपस्थित अधिकारी, जिल्हाधिकारी आणि इतरांशी चर्चा केली. सूर्यास्तानंतर हेलिकॉप्टरने प्रवास करणे अधिक जोखमीचे असेल असं सांगण्यात आलं. तसंच मुंबईला पोहोचण्यासही उशीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
अखेर चर्चेअंती आणि सल्ल्यानुसार एकनाथ शिंदे यांनी रस्त्याने कारने जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत आमदार उत्तम जानकर आणि स्वीय्य सहाय्यक आहेत. यामुळे एकनाथ शिंदे आपल्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत.
आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आताच एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. पंढरपुरात त्यांनी आढावा बैठक घेतली. सर्व वारकरी आणि सोयी सुविधांची त्यांनी माहिती घेतली. 3.30 वाजता ते टेक ऑफ करणार होते. मात्र आढाव बैठकीत उशीर झाला. हेलिकॉप्टरमध्ये येऊन बसले होते. पहिलं इंजिन सुरु झालं, मात्र दुसरं इंजिन सुरु बॅटरी कमी असल्याने सुरु झालं नाही. पायलटने प्रयत्न केल्यानंतर सुरु होत नसल्याने जिल्हाधिकारी, एसपी आणि आम्ही सर्व आमदारांनी जोखीम न घेता कारने पुण्याला जाण्याची विनंती केली. ती मान्य करत ते पुण्यापर्यंत कारने जाणार असून, त्यानंतर पुढील प्रवास करतील".
कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर होते. कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले, कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाला पाच कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे यांनी दिला असून रस्त्याची कामे आणि इतर खर्चासाठी हा निधी देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरशी संबंधित प्रमुख घटना
1) ऑक्टोबर 2023 – खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर मुंबईत परत
- मुंबईहून साताऱ्यातील दरे गावाकडे जात असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण वळवण्यात आले.
- दरे गावाजवळ पोहोचण्याआधी हेलिकॉप्टर जुहूच्या दिशेने परत आणण्यात आले.
- ही घटना तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर हवामानामुळे घडली.
2) ऑक्टोबर 2024 – साताऱ्यात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
- 18 ऑक्टोबर 2024 रोजी दरे गावातून पुण्याच्या दिशेने जाताना अचानक पावसाळी आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले.
- टेक ऑफनंतर सुमारे पाच मिनिटांत हेलिकॉप्टर पुन्हा दरे येथे उतरवण्यात आले.
- कोयना जलाशयाच्या परिसरात खराब हवामानामुळे धोका निर्माण झाला होता.
- त्यानंतर शिंदे रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना झाले.
3) मे 2026 – ऐरोलीजवळ वादळ, हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत
7 मे 2026 रोजी मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडच्या दिशेने हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
ऐरोलीजवळ पोहोचल्यावर पुढे धुळीचे वादळ आणि खराब हवामान दिसून आले.
पायलटने संभाव्य धोका लक्षात घेऊन हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला.
हेलिकॉप्टर जुहू येथील पवन हंस हेलिपॅडवर सुरक्षित उतरवण्यात आले.
4) सप्टेंबर 2026 – गुजरात दौऱ्यात तांत्रिक बिघाड
17 सप्टेंबर 2026 रोजी गुजरात दौऱ्यादरम्यान वडनगर येथून अहमदाबादला जाण्याची तयारी सुरू होती.
उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आढळली.
सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले.
एकनाथ शिंदे नंतर कारने अहमदाबादला रवाना झाले.