तेजस ठाकरे यांनी नव्या गोगलगायीचा शोध लावला; सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजाती
तेजस ठाकरे यांच्याकडून नव्या गोगलगायीचा शोध लावला आहे. ठाकरे फाउंडेशनच्या वतीने पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
तेजस ठाकरे : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी नव्या गोगलगायीचा शोध लावला आहे. कोल्हापूरच्या तिलारी नगर परिसरात सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. डिकॅरॅक्स तिलारिएन्सिस असं या नव्या प्रजातीचे शास्त्रीय नाव आहे. तिला तिलारी मायक्रो-स्नेल म्हणूनही ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून जवळपास 730 ते 740 मीटर उंचीवर या प्रजातीचा शोध लागला आहे.
तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी नगर परिसरात सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला. ‘डिकॅरॅक्स तिलारिएन्सिस’ (Dicharax tilariensis) असे या नव्या प्रजातीचे शास्त्रीय नाव असून, तिला ‘तिलारी मायक्रो-स्नेल’ म्हणूनही ओळखले जाते. ही प्रजाती तिलारी नगर येथील अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळते. उत्तर सह्याद्रीच्या पश्चिम घाट परिसरातून नोंदवण्यात आलेली Dicharax या वंशातील ही दुसरी प्रजाती आहे. त्यामुळे ठाकरे फाउंडेशनच्या वतीने पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या नावावरून या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 730 ते 740 मीटर उंचीवर या प्रजातीचा शोध लागला. या नव्या प्रजातीविषयीचे संशोधन ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ (Journal of Conchology) या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
यापूर्वी तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात खेकड्याच्या पाच प्रजाती शोधून काढल्या. घाटीयाना कुळातील दोन आणि सह्याद्रींना कुळातील तीन अशा एकूण पाच खेकड्यांच्या प्रजाती पश्चिम घाटातील गोड्या पाण्यात आढळल्या. तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी शोधलेल्या या प्रजातींची माहिती फ्रान्सच्या 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री'ने प्रकाशित केलेल्या 'झूसिस्टेमा' या संशोधन पत्रिकेत देण्यात आलीय. या शोधामुळे 8 प्रजातींची संख्या आता 13 झाली.