दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामध्ये विरोधी पक्षांची एकता दिसून येत नसल्याची टीका होत आहे. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील या मोर्चाकडे विरोधीपक्षातील अनेक खासदार, आणदारांनी पाठ फिरवल्याची टीका होताना दिसतेय. मात्र दुसरीकडे आमचं सारं काही ठीक सुरु असल्याचा दावा केला जातोय. एकीकडे हा गोंधळ सुरु असतानाच दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र विरोधकांमधील एकजूट कमी पडत असल्याचं ताजं उदाहरण सांगलीमधून समोर आलं आहे. या ठिकाणी पदवीधर मतदारसंघातील प्रचारादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला थेट इशारा दिल्याचं दिसून आलं आहे. नेमका हा वाद काय आहे? कोणी काय म्हटलंय ते जाणून घेऊयात...
शरद पवारांचा पक्ष देखील फोटो चोरणारा पक्ष
शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षालापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो वापरण्याच्या मुद्यावरुन इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंचा फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देण्यात आला आहे. तसेच जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष देखील फोटो चोरणारा पक्ष आहे, अशी घणाघाती टीकाही करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ही टीका केली आहे.
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटणार?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचार पत्रिकेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आल्याचं आरोप विनायक राऊतांनी हा आरोप केला आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, राऊत यांच्या आरोपामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये पुणे पदवीधर निवडणुकीत फोटोवरून वाद पेटणार आहे.
या वादाचं नेमकं कारण काय? कोणी कुठे छापलाय फोटो?
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचार पत्रका/बॅनरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिवसेना (UBT) चे मशाल चिन्ह वापरल्याचा आरोपही आहे. याच मतदारसंघातून शिवसेना (UBT) चा उमेदवार सुनील मोदी लढत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा आक्षेप आहे की, स्वतःचा उमेदवार असताना इतर पक्षाच्या प्रचार साहित्यात ठाकरेंचे फोटो वापरून मत मागणे म्हणजे मतदारांची फसवणूक आणि मतचोरी आहे. यावरुनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी स्पष्ट इशारा देताना, ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्हाचा वापर तातडीने थांबवा, असं म्हटलं आहे. राज्यपातळीवर मोठा पक्ष असूनही अशा पद्धतीने मते मागणे योग्य नाही, असंही विनायक राऊत म्हणालेत. असं केलं नाही तर अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही राऊत म्हणालेत. त्याचबरोबर मतदारांची जाहीर माफी मागा असंही विनायक राऊत म्हणालेत.