अल निनोमुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढणार! पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज, हिवाळ्यावरही होणार परिणाम
अल निनोमुळे यंदा परतीचा पाऊसच तर सोडाच पण ऑक्टोबर हिटचा तडाखा देखील नेहमीपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
चंद्रकांत फुंदे, पुणे
अल निनोमुळे यंदा परतीचा पाऊसच तर सोडाच पण ऑक्टोबर हिटचा तडाखा देखील नेहमीपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. दरम्यान, येत्या तीन चार दिवसात दक्षिण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी तो पाऊस रब्बी हंगामासाठी समाधानकारक असेलच असंही नाही, असंही निरिक्षण हवामान खात्याने नोंदवलं आहे. दरम्यान, यंदाचा हिवाळा देखील अल निनोच्या प्रभावामुळे कमी तीव्रतेचा असू शकतो, पण यासंबंधीचा सविस्तर अंदाज आम्ही नोव्हेंबरमध्येच जाहिर करू, असंही पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. पुणे वेधशाळेचे हवामानशास्ञज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितलं आहे की, "आपण सॅटेलाइटमध्ये पाहिलं तर सेंट्रल इंडियन रिजन किंवा दक्षिण भारतातील छोटा भाग सोडला तर उत्तरेकडे कुठेच कन्वेक्शन किंवा क्लाऊड फॉर्मेशन होताना दिसत नाही".
"बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्र असेल तिकडे कन्वेक्शन आहे, कारण त्या ठिकाणचं पाण्याचं तापमान जास्त असल्याने क्लाऊंड होणं साहिजक आहे आणि आपल्या रिजनवर पाऊस किंवा ढग नाही. याचं कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे जे कोरडे वारे आहेत त्याचं प्रमाण वाढलं आहे आणि मान्सूनचे वारे तसेही परतलेलेही आहेत. मान्सून अधिकृतपणे संपला असून, 24 तासात संपूर्ण भारतातून जाण्याची शक्यता आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
17 तारखेनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. पण त्यामुळे परिस्थिती बदलेल किंवा शेतकऱ्यांना नियोजन करता येईल असं काही दिसत नाही असंही ते म्हणाले आहेत.
"उत्तरेकडून येणारे जे कोरडे वारे आहेत, ते संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागावर फरक पाडत आहेत. त्यामुळे जी सी ब्रिज किंवा समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांची शिफ्ट होत असते दुपारी 12 नंतर एक दोन तास उशिरा होते. कोरड्या वाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण आणि निरभ्र आकाश दुपारी 3-4 वाजेपर्यंत राहिल्याने तेथील तापमान वाढतं. आणि त्यानंतर सी ब्रिज परत फॉर्म होतो. यामुळे रत्नागिरी, सांताक्रूज येथे जे किनारपट्टीचे भाग आहे तिथे काही दिवसांपासून तापमान सरासरीपेक्षा चार-पाच डिग्री सेल्सिअसने जास्त आहे," असं त्यांनी सांगितलं आहे.
रत्नागिरीला 12 तारखेला 39 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तशीची स्थिती मुंबई आणि लागून असलेल्या किनारपट्टी भागात आहे असंही ते म्हणाले आहेत.
यंदा ऑक्टोबर हिटचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असेल का? असं विचारलं असता ते म्हणाले की, "यावर्षी नक्कीच असं म्हणता येईल. किनारपट्टी नाही तर अंतर्गत भागातही तापमान सरासरीपेक्षा चार-पाच डिग्री जास्त असेल". हिवाळ्यातील स्थिती नोव्हेंबरअंती कळेल. पण यावेळी थंडीचं प्रमाण कमी असू शकतं असं त्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात पावसाची तूट जवळपास 18 टक्के आहे. महाराष्ट्रात यावर्षी फक्त 82 टक्के इतका पाऊस पडला आहे. तर देशात 87 टक्के पडला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट जास्त दिसून आली अशी माहिती त्यांनी दिली.