पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले
फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले आहेत. या नंबरप्लेटची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे.
कोल्हापूर : हौसेला मोल नसतं म्हणतात. पण कोल्हापूरकरांच्या हौसेला तर किंमतच नाही. गाडी कोणतीही असू दे, नंबर मात्र रुबाबातच पाहिजे. मग त्यासाठी खिशातून लाखो रुपये गेले तरी चालतील. अशाच हौशी कोल्हापूरकरांनी फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजलेत. विशेष म्हणजे फॅन्सी नंबरमधून सरकारी तिजोरी भरण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.
जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे उगाच म्हणत नाहीत. खाण्यापिण्यापासून ते राहणीमानापर्यंत आणि वाहनाच्या निवडीपासून ते वाहनाच्या नंबरपर्यंत. प्रत्येक गोष्टीत आपला एक वेगळाच रुबाब असला पाहिजे, हा अस्सल कोल्हापुरी बाणा. दारात कार आली की तिची काळजी पोटच्या पोरासारखी घ्यायची आणि नंबर घ्यायचा तर असा घ्यायचा की रस्त्यावरून जाताना सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या पाहिजेत. मग तो दुचाकीचा असो, चारचाकीचा असो, ट्रॅक्टर असो किंवा इलेक्ट्रिक बाइक. नंबर मात्र फॅन्सीच पाहिजे. हाच नाद अनेक पिढ्यांपासून चिखली गावातील पिसाळ कुटुंबीयदेखील जपत आहे. प्रसाद पिसाळ याच्या घरात 9890 नंबरची अनेक वाहने आहेत.
यंदा जानेवारीपासून 14 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 18 हजार 578 वाहनधारकांनी आपल्या आवडीच्या नंबरसाठी नोंदणी केलीय. त्यासाठी कोल्हापूरकरांनी मोजलेत तब्बल 19 कोटी 84 लाख 12 हजार रुपये...9595, 0101, 9099, 2700, 9191 असे नंबर मिळवण्यासाठी वाहनधारकांची अक्षरशः चढाओढ सुरू असते. काहींना जन्मतारीख हवी, काहींना शुभ अंक हवा, तर काहींना अंकांची बेरीज नऊ येणारा नंबर हवा. कोल्हापूर जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे एमएच 09, त्यामुळे गाडी कुठल्याही राज्यात घेऊन जा, नंबर प्लेटवर एमएच 09 दिसलं की आपण कोल्हापूरचे असल्याची ओळख अभिमानानं मिरवता येते आणि हीच ओळख जपण्यासाठी कोल्हापूरकरांची फॅन्सी नंबरसाठीची धडपड सुरू असते...आता हौस करायची तर ती मनापासून. नंबर आवडला की किंमत किती याचा फारसा विचार नाही. अशीच काहीशी कोल्हापुरी मानसिकता या आकड्यांतून समोर येतेय.
वाहनधारकांची ही हौस पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही आवश्यक प्रक्रिया राबवली जाते. आवडीचा नंबर मिळवण्यासाठी वाहनधारकांकडून ऑनलाइन नोंदणी आणि नियमानुसार शुल्क भरलं जातं...यंदा अवघ्या साडेदहा महिन्यांत 18 हजार 578 वाहनधारकांनी फॅन्सी नंबर मिळवलेत. यातून आरटीओच्या तिजोरीत तब्बल 19 कोटी 84 लाख 12 हजार रुपयांचा महसूल जमा झालाय... म्हणजे एकीकडे कोल्हापूरकरांची नंबरची हौस भागतेय, तर दुसरीकडे सरकारी तिजोरीही भरतेय. फॅन्सी नंबरच्या या कमाईनं कोल्हापूरनं राज्यात आपला वेगळाच ठसा उमटवलाय.
गाडी कुठलीही असो, नंबर मात्र आपल्या मनासारखाच पाहिजे..त्यासाठी हजारो नाही तर लाखो रुपये मोजायचीही तयारी. हीच तर अस्सल कोल्हापुरी स्टाईल. फॅन्सी नंबरच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत जवळपास 20 कोटींची भर घालणाऱ्या कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय, हौसेला मोल नसतं आणि कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड असतो.