अंबरनाथ क्राईम : अंबरनाथमध्ये एका नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. बाळाची सुखरूप सुटका करण्यात आलीय. या बाळाची गुजरातमध्ये विक्री केली जाणार होती, असंही पोलीस तपासात समोर आलंय. बाळ चोरीच्या या प्रकरणामुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडालीय. आता बाळचोरीच्या या प्रकरणामागे मोठी टोळी आहे का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
अंबरनाथमध्ये एका नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे बाळ अवघं 25 दिवसांचं असून आईच्या इच्छेविरूद्ध या बाळाला तिच्यापासून दूर नेऊन त्याची विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून बाळाची सुखरूप सुटका केलीय. या बाळाची गुजरातमध्ये विक्री केली जाणार होती असंही पोलीस तपासात समोर आले.
10 ऑक्टोबरला बाळ चोरीचा हा प्रकार घडलाय. आपल्या 25 दिवसांच्या बाळाला आईपासून दूर नेऊन नातेवाईकांमार्फत त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार बाळाचे वडील संतोष वाघे यांनी 11 ऑक्टोबरला पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान, एका मूकबधिर महिलेनं हे बाळ पळवून ते सोनी गणेश नावाच्या महिलेकडे दिल्याची माहिती समोर आली.
अंबरनाथमधील स्वामी नगर परिसरात सोनी गणेश हिच्याकडे ते बाळ देण्यात आल्याचं समजलं. या प्रकरणात पार्वती नावाची संबंधित महिला, तिचा काका भक्तिवेल आणि सोनी गणेश यांना पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान, हे बाळ रुक्सार नावाच्या महिलेकडेही देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईलच्या आधारे तपास करत रुक्सारचा शोध घेतला. तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून बाळाचा ताबा घेत पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली. बाळ चोरीच्या या प्रकरणामुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडालीय. आता बाळचोरीच्या या प्रकरणामागे मोठी टोळी आहे का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत.