आंबा हंगाम सुरू होण्यास अजून अवधी असतानाच कोकणातील बागायतदारांनी अनोखी किमया साधली आहे. जून-जुलैमध्ये आलेल्या मोहोराचे योग्य नियोजन व संरक्षण करून देवगडच्या बागायतदारांनी हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली आहे. तर दुसरीकडे रत्नागिरीच्या स्थानिक बाजारातही संकष्टीच्या मुहूर्तावर हापूसची पहिली पेटी दाखल झाली असून,हंगामापूर्वीच बाजारात आलेल्या या हापूसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
देवगड तालुक्यातील गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार निलेश वसंत बांदकर यांनी आपल्या बागेतील आंब्यांची पहिली पेटी वाशी मार्केटकडे रवाना केली आहे. गुरुवार, 29 ऑक्टोबर रोजी संकष्टीच्या मुहूर्तावर त्यांनी साडेसहा डझन आंब्यांची पेटी काढली आहे.
देवगडचा हापूस आंबा चव, सुगंध आणि दर्जासाठी प्रसिद्ध आहे. हंगामापूर्वीच आंबा बाजारात पाठविण्याच्या बांदकर यांच्या प्रयोगामुळे विजयदुर्ग विभागातील आंबा बागायतदारांचे लक्ष वेधले गेले आहे.
बांदकर यांच्या बागेतील काही कलमांना जून महिन्यातच मोहोर आला होता. या मोहोराचे संगोपन करून फळधारणा व्हावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मोहोर आलेल्या चार ते पाच कलमांना प्लास्टिक कागदाचे आवरण घालून संरक्षण केले. तसेच वेळोवेळी फवारण्या करून मोहोर आणि फळांची निगा राखली. या प्रयत्नांना यश मिळाल्याने ऑक्टोबर महिन्यातच आंब्याची पहिली पेटी काढणे शक्य झाले.
पहिल्या पेटीनंतरही हा प्रयोग सुरू ठेवण्याचा बांदकर यांचा मानस आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आणखी पाच डझन क्षमतेच्या सहा ते सात पेट्या काढण्यात येणार असल्याचे निलेश बांदकर यांनी सांगितले. वाशी मार्केटमध्ये पहिल्या पेटीला किती दर मिळतो, याबाबत आंबा उत्पादकांमध्ये उत्सुकता आहे.
दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात आंब्याची पेटी वाशी मार्केटला पाठविल्यानंतर यंदा ऑक्टोबरमध्येच पहिली पेटी रवाना करून बांदकर यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रयोगशीलतेची प्रचिती दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे देवगडच्या हापूस आंब्याची हंगामापूर्वीच बाजारपेठेत चर्चा सुरू झाली आहे.
कोकणचा राजा हापूस आंब्याची पहिली पेटी हंगामापूर्वीच वाशी मार्केटमध्ये रवाना झाली. देवगडच्या गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार निलेश बांदकर यांनी ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन घेत नवा प्रयोग यशस्वी केला. संकष्टीच्या मुहूर्तावर काढलेली ही पेटी शुक्रवारी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाली. आणि वाशी मार्केट मध्ये तब्बल 36 हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला. विशेष म्हणजे, दिवाळी पाडव्याला आणखी सहा ते सात पेट्या बाजारात पाठवण्याचे नियोजन असल्याचे बागायतदारांचा संकल्प आहे.