दिवाळीपूर्वी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता जारी केला. या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत. असे असले तरी तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का, याची खात्री कशी करायची? हप्ता अडकला असेल तर काय तपासायचे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधानांनी पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता जारी केला. यावेळी देशातील ९.३४ कोटी पात्र शेतकरी कुटुंबांसाठी एकूण 18680 कोटी रुपये वितरित करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात 2000 रुपये थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBT पद्धतीने पाठवण्यात आले आहेत. मागील 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित झाला होता. त्यावेळी 9.44 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला होता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वर्षभरात एकूण सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. म्हणजे साधारण दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा हप्ता जमा होतो. महाराष्ट्रातील पात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
तुमचा 24 वा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे घरबसल्या तपासता येते. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला(https://pmkisan.gov.in/) वर जा. होमपेजवरील फार्मर कॉर्नर विभागात जा. क्लो यूअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरा. नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ओटीपी टाकून पुढे जा. स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची पेमेंटची स्टेटस माहिती दिसेल.यामध्ये पैसे कोणत्या बँकेत पाठवले, यूटीआर क्रमांक, खात्यात जमा झाल्याची तारीख आणि पेमेंटची स्थिती पाहता येते.
ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार क्रमांक आणि बँक खात्याच्या तपशिलांमध्ये तफावत असणे किंवा जमीन नोंदींची पडताळणी प्रलंबित असणे, यामुळे हप्ता अडकू शकतो. त्यामुळे क्लो यूअर स्टेटस विभागातील ईकेवायसी, लॅण्ड सिडींग आणि आधार बँक सिडींग या नोंदी तपासा. ई-केवायसी पूर्ण नसेल तर पीएम किसान पोर्टल, मोबाइल अॅप किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ती पूर्ण करता येते. जमीन नोंदींच्या समस्येसाठी संबंधित तलाठी किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोर्टलवरील बेनिफिशियरी लिस्ट पर्यायातून तुमचे नाव तपासता येते. त्यासाठी राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका आणि गाव निवडून यादी पाहता येते. मात्र, यादीत नाव असणे आणि 24 व्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे केवळ लाभार्थी यादीवर अवलंबून न राहता पेमेंट स्टेस तपासणे महत्त्वाचे आहे. काही संशयित अपात्र प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ तात्पुरता रोखला जाऊ शकतो, अशी माहिती अधिकृत पोर्टलवर देण्यात आली आहे.