महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी मुली मुलांवर नाही, तर पैशांवर प्रेम करतात, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाईंदरमध्ये दिवाळी वंडरलँड कार्यक्रमात प्रेमाविषयी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवाळी सणानिमित्त भाईंदर पूर्वेकडील नवघर नाका येथे ‘दिवाळी वंडरलँड’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी प्रेमाविषयी आपले मत व्यक्त केले.
असे म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तिच्या मेंदूच्या तीन शिरा चोकअप आहेत. तेवढ्या काढून ये. पोरगी कधीच मुलावर प्रेम करत नाही. पोरगी पैशावर प्रेम करते. मुलगी कधीच प्रेम करत नाही. खरं आहे की खोटं आहे. तुम्हाला तिघांना आलेला अनुभव आहे. याला (एका तरुणाकडे इशारा करत) तर मागच्याच महिन्यात मुलीने धोका दिला आहे. खोटं बोलणार नाही.
प्रेम वगैरे हे सगळं काही नसतं. लव्ह इज अ मनी आणि मनी इज अ लव्ह. आणि मनी इज अ लाइफ आणि लाइफ इज अ मनी. ही इंदुरीकरांची व्याख्या आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी मुलींच्या प्रेमाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
Indurikar Maharaj Controversial Statement | मुली मुलांवर नाही, पैशांवर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चर्चेत #IndurikarMaharaj #Indurikar #ControversialStatement #MarathiNews #Zee24Taas https://t.co/FfKxLXNJYW
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 17, 2026
इंदुरीकर महाराजांनी मोबाईलबाबतही नागरिकांना सल्ला दिला आहे. मोबाईलमुळे लोक वेडी झाली आहेत. मोबाईल ही भारी वस्तू असून ते सतत उघडे ठेवू नका असेही इंदूरीकर महाराज म्हणाले.
सरकारने दिलेल्या पाच हजार रुपये आणि केंद्राच्या दोन हजार रुपयांमुळे यंदा सर्वांची दिवाळी मोठी झाली असे म्हणत इंदुरीकर महाराजांनी सरकारच्या मदतीचे कौतुक देखील केले. तसेच त्यांनी झेडपीच्या आणि नगरपालिकेच्या शाळा वाचल्या पाहिजेत नाहीतर सामान्य माणसाची मूल शिकू शकत नाहीत असेही म्हटले.