कोकणातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना टळली; 25 वर्षाचा तरुण सुखरुप बचावला
आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला मरीन होमगार्डनी जीवदान दिले आहे. 25 वर्षाचा तरुण सुखरुप बचावला आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील आचरा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना टळली आहे. एक तरुण पर्यटक सुखरुप बचावला आहे. आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला मरीन होमगार्डच्या जवानांनी जीवदान दिले आहे. हा पर्यटक मुंबईचा आहे. समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना खबरदारी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. एकाधी लहानशी चूक देखील जीवावार बेतू शकते.
भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडू लागलेल्या मुंबई येथील 25 वर्षीय पर्यटकाला मरीन होमगार्डच्या दोन जवानांनी प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे वाचवले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी समुद्राच्या जोरदार प्रवाहाची पर्वा न करता तातडीने बचावकार्य करत पर्यटकाचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आचरा येथील नातेवाईकांकडे मुंबईहून आलेले एक कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील एक व्यक्ती समुद्रात अंघोळ करण्यासाठी उतरली असता, भरतीची वेळ असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
कुटुंबीयांचा आक्रोश ऐकताच मरीन होमगार्ड नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या दिशेने धाव घेतली. पाण्याचा जोर आणि लाटांचा धोका असतानाही दोघांनी धाडसाने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी मोहम्मद खान यांना सुरक्षितपणे समुद्राबाहेर काढले. दोन्ही जवानांच्या प्रसंगावधानामुळे पर्यटकाला वेळीच मदत मिळाली आणि मोठा अनर्थ टळला.
मालवण येथील मच्छीमार गोपी तांडेल यांची 'भगवती' नावाची नौका मासेमारीसाठी देवगड समुद्रात गेली होती. बोटीच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. समुद्रात बोटीला आग लागल्याचे समजताच खलाशांमध्ये धावपळ उडाली. मात्र, वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे बोटीवरील सर्व 25 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.