ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून आरोपांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप होता. त्यांची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. याप्रकरणी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची 8 वेळा, तर मीनाक्षी शिंदेंची 2 वेळा चौकशी कऱण्यात आली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि पूर्णेकर कुटुंब आक्रमक झाले असताना अखेर त्यांनी पद सोडलं आहे.
मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला असून त्यात लिहिलं आहे की, "मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे".
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षांतर्गत माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वबाबींचा एकत्रित वेध घेऊन माझ्यावर विविध आरोप करता पक्ष नेतृत्वाचा अर्थात मुख्य नेते व पक्षांतर्गत म्हणून आपणास वेढीस धरण्याचे जे षड्यंत्र चालू आहे ते पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते अशा भावना त्यांनी मांडल्या आहेत.
ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, हे कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे. माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पूर्णेकर यांच्या मुलाने काही पुरावे समोर आणल्याचा दावा राऊत यांनी केला. हत्येपूर्वी आरोपींसोबत राजेंद्र शिंदे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊत यांनी ठाणे पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. एसआयटीच्या तपासावरही त्यांनी टीका केली आहे. तर मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा पलटवार नरेश म्हस्केंनी केला आहे.