मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूककोंडीचा फटका, 25 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 20 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी वर्सोवा ब्रिज ते वसईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण वाहतूक कोंडीचा फटका बसला असून या कोंडीत झालेल्या अपघातात 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरारहून मुंबईच्या दिशेने जात असताना दुचाकीवरील तरुणी मोठ्या कंटेनरखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बुधवारी सकाळपासूनच वर्सोवा ब्रिजपासून विरार हद्दीपर्यंत सुमारे 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना तासन् तास कोंडीत अडकून पडावे लागले होते. ठाण्यात पूर्णेकर समर्थकांनी मंगळवार दुपारीपासूनच आंदोलन पुकारले होते. त्याचा परिणाम मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झाला.
ठाण्यातील रास्ता रोको आंदोलनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती आहे. परिणामी, महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन विस्कळीत होऊन कोंडीत भर पडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
सहा तास ठाणे घोडबंदर मार्ग ठप्प केला
पूर्णेकर समर्थकांनी काल रात्री तब्बल सहा तास ठाणे घोडबंदर मार्ग ठप्प केला होता. मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांना तात्काळ अटक करा अन्यथा हटणार नाही अशी भूमिका समर्थकांनी घेतली होती. पोलिसांनी समर्थकांची समजूत काढली मात्र कोणताही मार्ग न निघाल्याने परिसरातील विद्युत रोषणाई बंद करत पोलिसांनी थेट समर्थकांवर लाठीचार्ज केला यानंतर समर्थकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण संपूर्ण मानपाडा परिसरात निर्माण झाले होते.
आता तब्बल सहा तासानंतर वाहतूक जरी सुरळीत असली तरी देखील संपूर्ण मानपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी घोडबंदर मार्गावरील मानपाडा प्रदीप पुर्णेकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तैनात केली असून परिसरातील दुकानेही अद्याप बंद दिसून येत आहेत.