रात्रीची वेळ अन् वाशी ते पनवेल प्रवास! धावत्या कारमध्ये तरुणीसमोर कॅब चालकाचे अश्लील चाळे, धक्कादायक घटना समोर
मुंबईत अनेक महिला, तरुणी कॅबमधून प्रवास करतात. पण एका कॅब चालकाने धावत्या कारमध्ये तरुणीसमोर अश्लील कृत्य केलं.
मुंबईमध्ये टॅक्सीशिवाय अॅपद्वारे अनेक प्रवासाठी कार मिळतात. दिवसा असो या अपरात्री घरी लवकर पोहोचण्यासाठी आणि सुखकर प्रवासासाठी असंख्य जण या कॅबचा फायदा घेत असतात. आई - वडिलांसोबत एका महिलेने अॅपवरून कॅब बूक केली. पण त्या तरुणीला या प्रवासादरम्यान धक्कादायक अनुभव आला. त्या कॅब चालकाने धावत्या कारमध्ये तरुणीचे विनयभंग केला.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांच्या सुमारास पीडित महिला आपल्या आई-वडिलांसह वाशी येथून नवीन पनवेल येथे जाण्यासाठी एका ॲपच्या माध्यमातून कॅब बुक करून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान महिला चालकाच्या शेजारील पुढच्या सीटवर बसली होती, तर तिचे आई-वडील मागील सीटवर बसले होते.
दरम्यान, कॅब शीव-पनवेल महामार्गावरून नेरुळच्या दिशेने जात असताना चालकाने अचानक गाडी चालवताना अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. चालकाच्या या किळसवाण्या प्रकारामुळे महिला प्रवासी संतापली आणि तिने तत्काळ त्याला जाब विचारला. महिलेने जाब विचारताच चालकाने आपले कृत्य थांबविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेने न घाबरता संबंधित कॅबचालकाला थेट खांदेश्वर पोलीस ठाण्यात नेले. मात्र, घटनास्थळ नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने खांदेश्वर पोलिसांनी महिलेला नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने नेरुळ पोलिसांकडे अधिकृत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे नेरुळ पोलिसांनी संबंधित कॅबचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेत नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पाटील करत आहेत.