SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रस्त्याच्या मधोमध जाळपोळ, घोषणाबाजी अन्... घोडबंदर रोडवर रात्रभर राडा; टू व्हिलर हलवायलाही जागा नाही एवढं ट्रॅफिक; नेमकं झालं काय?

रात्री साडेदहाच्या सुमारास सुरु झालेला हा सारा प्रकार अगदी पहाटेपर्यंत सुरु होता. याचा परिणाम अगदी सकाळच्या वाहतुकीवरही दिसून आला. नेमकं घोडबंदरवर झालं काय? नक्की कोणी आणि कशासाठी हे आंदोलन केलं जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 28, 2026, 06:44 AM IST | Updated: Oct 28, 2026, 07:26 AM IST
Image Credit: जागोजागी जाळण्यात आले टायर
Join

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील मानपाडा येथील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकरांच्या हत्या प्रकरणाला जवळपास एक महिना होत आला आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरु असला तरी अद्याप कोणाच्या संगण्यावरुन ही हत्या करण्यात आली हे स्पष्ट झालेलं नाही. आरोपी ताब्यात असले तरी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीनेच हे घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकरांच्या कुटुंबियांकडून केला जातोय. या प्रकरणामध्ये राजेंद्र शिंदेंसंदर्भातील काही पुरावे पुर्णेकरांचा मुलगा राम पुर्णेकरांनी पोलिसांन दिले असून या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधारांना अटक का केली जात नाही असा सवाल विचारला जातोय. याच संतापाचा कडेलोट काल मुंबई आणि गुजरातला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर दिसून आला. पूर्णेकरांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी पूर्णेकर समर्थक घोडबंदर रोडवर उतरले. 

घोडबंदरवर रात्रभर वाहतूक कोंडी

मंगळवारी रात्री संतप्त पूर्णेकर समर्थकांनी घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरात तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे घोडबंदर रोडवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत राजेंद्र शिंदे व माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या तात्काळ अटकेची मागणी पूर्णेकर समर्थकांकडून केली जात आहे. पहाटे अडीच ते तीननंतरही अनेक ठिकाणी या आंदोलनामुळे वाहनं अडकून असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखून धरण्यात आली. पूर्णेकरांना न्याय देण्याची मागणी करत समर्थक घोषणाबाजी करत होते.

अनेक ठिकाणी साधी दुचाकी बाजूला घेण्यासाठीही जागा नव्हती एवढी वाहतूक कोंडी होती. कोलशेत गाव आणि इतर आतील भागामध्येही जागोजागी पूर्णेकर समर्थकांनी रस्ते अडवून धरले. या आंदोलनामुळे वाहतूककोंडीत अडकलेल्यांना पूर्णकर समर्थकांनीच पाण्याच्या बाटल्या वगैरे वाटल्याचा दावा करणारे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

उद्या ठाण्यात सर्वपक्षीय आंदोलन

दरम्यान, याच प्रकरणामध्ये पूर्णेकरांच्या कुटुंबियांना न्याय मिळून द्या या मागणीसाठी उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ठाण्याच्या जांभळी नाका येथे सर्वपक्षीय 'भयमुक्त ठाणे' ना मथळ्याखाली आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनाला आदित्य ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे स्वत: ठाणे पोलीस आयुक्तांना भेटून पूर्णेकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी करणार आहेत. प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्यावा, सूत्रधार असलेल्या शिंदे दांपत्यावर कारवाई करावी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.

ठाण्यातील वाढती गुन्हेदारी, ड्रग माफियांचा विखळ्यात सापडपेलं ठाणे शहर भयमुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरणार आहेत. आदित्य ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला ठाण्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील असं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी सर्व पक्षांनी एकत्रितपणे ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत रहावी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यात यावा या मागणीसाठी संयुक्त मोर्चा काढला होता.

29 सप्टेंबर रोजी मानपाडा भागातील प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात त्यांची धारदार शस्त्रांनी आणि गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 मुख्य आरोपींना अटक केली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES