'माझ्या खुर्चीवर बसू नकोस,' रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले; स्टेजवरच खडाजंगी 'माझ्यावर मेहरबानी करतो का...'
शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंच्या मेहुण्याला खुर्चीवरून झापलं. पोयनार धरण कार्यक्रमात ही खडाजंगी पहायला मिळाली.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंच्या मेहुण्याला थेट मंचावरुन झापलं आहे. खेडमध्ये आयोजित पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात भर मंचावर चांगलाच वाद पेटला. रामदास कदम यांनी मंचावरुनच 'माझ्या खुर्चीवर बसू नकोस' अशा शब्दांत सुनावलं. इतकंच नाही तर 'थेट वरची पायरी गाठू नका' असा सज्जड दमही भरला. यानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाल्याने कार्यक्रमात काही काळासाठी थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
झालं असं की, शिवसेना नेते रामदास कदम भाषण करत असताना सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर थेट कदमांच्या राखीव खुर्चीवर जाऊन बसले. हे पाहताच कदम रामदास कदम यांनी आपलं भाषण थांबवत ''माझ्या खुर्चीवर बसू नकोस, एका एका पायरीने वर जा, थेट वरची पायरी गाठू नका'' असा सज्जड दम भरला. यावर बिरवटकरांनीही हात जोडून नाराजी व्यक्त केली.
यानंतर रामदास कदम यांनी अजय बिरवटकरांसाठी खूर्चीची व्यवस्था करण्यास सांगितलं. मात्र अजय बिरवटकर यांनी रामदास कदम यांना म्हटलं की, 'मी हात जोडून विनंती करत आहे. मी दु:खात असतानाही कार्यक्रमासाठी आलो आहे'. त्यावर रामदास कदम यांनी माझ्यावर मेहरबानी केली असं सुनावलं. तसंच मी भाषण करतोय असं सांगत थांबण्यास सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "दु:खात मी पण आहे. माझीही आईही गेली आहे. दु:खाचं आम्हाला काय सांगत आहात. आपण लोकांसाठी, जनतेसाठी येथे जमलो आहोत आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. जनहिताचं काम आम्ही हाती घेतलं आहे. कोयनेच्या पाण्यावरुन तुम्ही माझ्यावर टीका केली. मी त्याचं उत्तर दिलं नाही. पण मी तुम्हाला फाईल दाखवीन".
यानंतर कदमांनी सुनील तटकरेंवरही निशाणा साधत,''धरण भरल्यावर तटकरेंना जलपूजनाला नक्की बोलावू. ते खासदार आहेत ना, जलपूजन त्यांच्या हस्ते करु'' असा खोचक टोला लगावला. या शाब्दिक चकमकीमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
पोयनार धरणाचा 25 वर्षांचा वनवास संपला; 265 कोटींच्या कामाचे भूमिपूजन!
कोकणातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात रखडलेल्या खेड तालुक्यातील पोयनार धरणाचा अखेर 25 वर्षांचा वनवास संपला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे या धरणासाठी 265 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मतदारसंघातील सिंचन क्रांतीला नवी दिशा! - योगेश कदम
गेली 26 वर्षे रखडलेल्या पोयनार लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या 265.38कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा, ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासभाई कदम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. विधानसभेत निवडून आल्यानंतर माझ्या अधिकृत लेटरपॅडवरील पहिले पत्र याच प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश मिळाले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 1100 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 14 गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. एकाही प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ न देता; पुनर्वसन, मोबदला आणि नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करून हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे अशी पोस्ट योगेश कदम यांनी केली आहे.