रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत मोठा दावा केलाय. आगामी काही दिवसांत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर असतील, असे दळवी म्हणाले. तटकरे यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने वेग घेतला आहे. याच मुद्द्यावरून दळवींनी तटकरेंना लक्ष्य केले. आधी विलीनीकरणाबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगणारे तटकरे आता अजितदादांनी आपल्याला याबाबत सांगितले होते, असे म्हणत असल्याचा आरोप दळवींनी केला. तटकरेंना या घडामोडींची आधीपासून माहिती होती, असा दावाही त्यांनी केला.
जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. रायगडमध्ये यापुढे शिवसेना ठरवेल तोच खासदार होईल, असे विधान त्यांनी केले. महाडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश चालतो; मात्र श्रीवर्धनमध्ये शिवसेनेने प्रवेश केला की आक्षेप घेतला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षवाढीच्या प्रयत्नांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. माणगावमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची राजकीय चर्चा आहे. श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी पक्ष सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होतोय या घडामोडीमुळे तटकरे कुटुंबाचा प्रभाव असलेल्या श्रीवर्धनमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
माणगाव आणि श्रीवर्धनमधील पक्षप्रवेश कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी रायगडचा खासदार शिवसेनेचा आणि श्रीवर्धनचा आमदार शिवसेनेचा करण्याचे आवाहन केले. त्यामुळे महायुतीत एकत्र असलेल्या दोन पक्षांमधील स्थानिक संघर्ष पुन्हा उघड झाला आहे. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.