ठाणेकरांना दिवाळी गिफ्ट! 2 मोठ्या प्रकल्पांबाबत आली गुड न्यूज, डिसेंबरमध्ये मेट्रो धावणार?
गायमुख ते कासारवडवली आणि कासारवडवली पासून कॅडबरीपर्यंतचा मेट्रो 4चा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.
ठाणेकरांना दिवाळीचे गिफ्ट मिळणार आहे. लवकरच ठाण्यात मेट्रो धावणार असून गायमुख ते कासारवडवली मेट्रो सेवा सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसंच, घोडबंदरच्या वाहतूक कोंडीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गायमुख ते कासारवडवली मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दिवाळीच्या काळात ठाणेकरांसाठी हे खऱ्या अर्थाने गिफ्ट ठरेल, असेही सरनाईक यांनी सांगितले
गायमुख ते कासारवडवली मेट्रो सेवा सुरू झाल्यास या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास आणि प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते. मात्र, मेट्रो सेवा सुरू होण्याची नेमकी तारीख आणि वेळापत्रक याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गायमुख ते दहिसर मेट्रो सेवाही लवकरच सुरू होणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या मेट्रो मार्गामुळे ठाणे, घोडबंदर परिसर आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर कोस्टल रोडचा पर्याय
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी हा ठाणेकरांसाठी दीर्घकाळापासून चिंतेचा विषय आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा वेळ खर्च करावा लागतो. या समस्येवर दिलासा देणाऱ्या प्रस्तावित कोस्टल रोडची पाहणी दौऱ्यादरम्यान प्रताप सरनाईक यांनी केली
कोस्टल रोड प्रकल्पामुळे घोडबंदर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेट्रो सेवा आणि कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे
एकीकडे दिवाळीत मेट्रो सेवेची अपेक्षा, तर दुसरीकडे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनांची आशा, यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गायमुख ते कासारवडवली मेट्रो कशी असेल?
गायमुख ते कासारवडवली- कॅडबरी जंक्शनदरम्यान ही मेट्रो धावणार असून लाखो प्रवाशांना फायद्याची ठरणार आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मेट्रो मार्गिका क्रमांक 4चा पहिला टप्पा आहे. डिसेंबरमध्ये हा टप्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
कासारवडवली ते गायमुख पर्यंत मेट्रो मार्ग 4अ हा 2.7 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये २ स्थानके आहेत. हा मुंबई मेट्रो मार्ग 4 (वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे - कासारवडवली) या मार्गाचा कासारवडवली बाजूचा विस्तार आहे.