एल निनोमुळं यंदा महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट होती. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊसच झाला नाही. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरे संकट म्हणजे तापमानामुळं धरणातील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. त्यामुळं महानगरांसह गावागावात पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऐन हिवाळ्यातच पाणीसाठा आटत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र, ती लागू होण्यापूर्वीच ठाणेकरांना दररोज 47 दशलक्ष लिटर पाण्याची तूट सहन करावी लागत होती. आता आणखी 59 दशलक्ष लिटरची घट होणार असल्याने शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यातून मागणी आणि पुरवठ्यातील दररोजची तफावत तब्बल 106 दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचू शकते.
वाढती लोकसंख्या आणि नव्या गृह संकुलांमुळे शहराची पाण्याची गरज 637 दशलक्ष लिटरवर पोहोचली असताना प्रत्यक्षात केवळ 590 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. कपातीनंतर ही उपलब्धता सुमारे 531 दशलक्ष लिटरवर येण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका घोडबंदर रोड, वर्तकनगर, लोकमान्यनगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसराला बसत आहे.
ठाणे शहरातील काही भागांत कमी दाबाने किंवा अपुऱ्या वेळेत पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरात ऑक्टोबरपासूनच दररोज सरासरी 75 टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.
ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा प्रभागांतील काही भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र वेचून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात नेणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले.
शासनाच्या निर्णयानुसार 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे ठरले आहे. त्यानुसार एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समित्यांच्या हवीतील सर्व भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.