₹8 लाखांचं पॅकेज, ₹20 लाखांचा दिवळी बोनस! 'या' कंपनीचे भारतीय कर्मचारी मालामाल; कंपनीनेच सांगितलं एवढ्या मोठ्या बोनसमागचं खरं कारण
यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा असतानाच कंपनीनेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंपनीने नेमके एवढे पैसे का दिले आहेत? कंपनीचं यासंदर्भातील म्हणणं काय आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
खरं तर अनेकांना दिवाळी बोनस मिळाल्यानंतर तो आता संपलाही असेल पण एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक पॅकेजपेक्षाही अधिक बोनस दिल्याचं वृत्त आहे. या कंपनीने सदर चर्चेसंदर्भात प्रतिक्रियाही नोंदवली आहे.
ही कंपनी कोणती?
या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या 'मायक्रॉन'मधील कर्मचाऱ्यांना मोठा बोनस दिल्याचं वृत्त आहे. कंपनीने आपल्या 'आर्थिक वर्ष 2026'मधील रिवॉर्ड्स कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली. जगभरातील 60 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना 'थँक यू' बोनस, कामगिरीवर आधारित मोबदला आणि स्टॉक रिवॉर्ड्स देत असल्याची घोषणा कंपनीने केली. कंपनीच्या भारतातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत रोख बोनस देण्यात आल्याच्या वृत्ताला 'मायक्रॉन'ने दुजोरा दिला आहे. आर्थिक वर्षातील कामगिरी अत्यंत उत्तम झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांना भागीदार बनवून घेत चक्क शेअर्स वाटले.
8 लाख पॅकेज, 20 लाख बोनस
अनिरबान चौधरी नावाच्या व्यक्तीने आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्यांच्या ओळखीच्या एकाने नुकतील मायक्रॉन इंडिया कंपनी जॉइन केली आहे. त्याचे वार्षिक पॅकेज सुमारे 7 ते 8 लाख रुपये आहे. या कर्मचाऱ्याला कथितरीत्या 12 लाख रुपये रोख आणि 8 लाख रुपये मूल्याचे 'रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स' मिळाले आहेत, जे पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने त्याच्या मालकीचे होणार आहेत. "ज्याचे वार्षिक उत्पन्न 7-8 लाख रुपये आहे, त्याच्यासाठी ही रक्कम जवळपास 20 लाख रुपये इतकी होते," असे चौधरी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. हा कर्मचारी डिझाइन किंवा वितरण नाही तर उत्पादन विभागात काम करत असल्याचा दावा अनिरबान चौधरींनी केला आहे.
साडेसहा लाख बोनस
दुसरीकडे रेडिटवरील एका युझरने आपल्या पोस्टमध्ये, कंपनीत नुकताच नोकरीला लागलेल्या त्याच्या एका मित्राला ऑक्टोबरच्या पगारासोबत साडेसहा लाख रुपयांचा बोनस देण्यात आला आहे. "मायक्रॉनमध्ये नुकताच रुजू झालेल्या माझ्या एका मित्राला साडेसहा लाख रुपयांचा भरघोस बोनस मिळाला आहे. कंपनीने त्याच्या ऑक्टोबर महिन्याचा पगार आणि बोनस एकाच वेळी दिलाय. त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय," असे या रेडिट युझरने पोस्टमध्ये लिहिले. या पोस्टवर अन्य एका रेडिट युझरने ही रक्कम जॉइनिंग बोनस आहे की कामगिरीवर आधारित पेमेंट आहे, हे स्पष्ट करावं असं म्हटलं आहे. या पोस्टखाली इतरांनी इंजिनिअर, सिनियर इंजिनिअर, स्टाफ आणि लीड यांसारख्या पदांनुसार मिळणाऱ्या रकमेत फरक असतो का, याबद्दल कमेंटध्ये बरीच चर्चा केल्याचं दिसत आहे.
कंपनीचं म्हणणं काय?
सोशल मीडियावर 'मायक्रॉन'च्या भारतातील काही कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त अती जास्त रक्कम बोनस म्हणून देण्यात आल्याची चर्चा सुरु असतानाच या वृत्ताला कंपनीने थेट पत्रक काढून दुजोरा दिलाय. “मायक्रॉनच्या यशात आमच्या टीममधील सदस्यांना सहभागी करून घेणे हे आमच्या रिवॉर्ड पॉलिसीचा मुख्य भाग आहे. एका उत्तम आर्थिक वर्षानंतर, जगभरातील 60 हजाराहून हून अधिक कर्मचाऱ्यांना आमच्या आर्थिक वर्ष 2026 साठी रिवॉर्ड आणि स्टॉक रिवॉर्ड्सचा लाभ देण्यात आला आहे. या रिवॉर्डमध्ये एक विशेष ‘थँक्यू’ बोनस, कामगिरीवर आधारित बोनस आणि कंपनीस्तरावर देण्यात येणाऱ्या स्टॉक रिवॉर्ड्सचा समावेश आहे. भारतातील आमच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत हा रोख बोनस देण्यात आला आहे,” असे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.