एका व्यक्तीने आपल्याच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. आरोपीने कर्मचाऱ्याला त्याच्या मुलीसोबत रंगेहाथ पकडलं होतं. बंगळुरूच्या येलाहंका भागात ही घटना घडली आहे. मृताची ओळख किरण अशी पटली आहे, तर आरोपीचे नाव आनंद राज आहे. किरण मूळ केरळता तर आरोपी आनंद राज तमिळनाडूचा रहिवासी आहे. आनंद राज हा 'स्वीट कॉर्न' बनवण्याची यंत्रे तयार करणारा एक छोटा कारखाना चालवतो आणि त्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी किरणला तिथे कामावर ठेवले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, किरणचे आनंद राजच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या नात्यामुळे आनंद राज नाराज होता.सोमवारी, आनंद राजने आपल्या मुलीला सांगितले की तो तमिळनाडूतील आपल्या गावी जात आहे. मात्र, त्याच दिवशी दुपारी तो आपल्या पत्नीसह पुन्हा येलाहंकाला परतला. दरम्यान, किरण घरी आला होता आणि आनंदच्या मुलीसोबत एका खोलीत असताना, आनंद राजने त्यांना एकत्र पकडले.
यानंतर, आनंद राजने आपल्या मुलीला तिच्या आईसोबत चिक्कबल्लापूरमधील एका नातेवाईकाच्या घरी पाठवून दिले. त्याने किरणला घरातच डांबून ठेवले आणि रात्रभर बॅटने त्याला बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी दुपारी, आनंद राजने किरणच्या पोटाच्या खालच्या भागात लाथ मारली, ज्यामुळे तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. आरोपीने त्याला रिक्षातून रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर येलाहंका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.
आनंद राजची मुलगी म्हैसूरमध्ये प्री-युनिव्हर्सिटी कोर्सच्या (PUC) दुसऱ्या वर्षात शिकत असून ती तिथे वसतिगृहात राहते. दसऱ्याच्या सुट्टीत ती घरी आली होती, त्या दरम्यान तिची किरणसोबत जवळीक वाढल्याचे सांगण्यात येत आहे. येलाहंका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आनंद राजला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.