धक्कादायक! राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षारक्षकावर गोळीबार! फटाक्यांवरुन शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादातून झाडली गोळी
पोलिसांनी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यासाठी पथके तयार केली आहेत.
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या एका सुरक्षारक्षकावर गोळीबार करण्यात आला आहे. हा सुरक्षा कर्मचारी दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त उत्तर प्रदेशातील बागपत येथे आपल्या घरी आला होता, फटाके फोडण्यावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. डोक्यात गोळी लागल्याने तो जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बागपतचे पोलीस अधीक्षक (एसपी) पूर्णेंदू सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी जवानाला लागण्यापूर्वी भिंतीवर आदळली होती. यामुळे तिचा आघात कमी झाला. डॉक्टरांनी गोळी बाहेर काढली असून, आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
जखमी जवानाची ओळख पटली असून, त्यांचं नाव सौरभ कुमार आहे. ते तो राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष दलाचा भाग आहेत, अशी माहिती पूर्णेंदू सिंग यांनी दिली आहे. 'President’s Bodyguard' (राष्ट्रपती अंगरक्षक दल) हे एक अत्यंत प्रतिष्ठित दल असून, याची स्थापना 1773 मध्ये झाली होती. हे लष्करातील सर्वात जुन्या रेजिमेंटपैकी एक आहे.
नेमका काय वाद झाला?
सौरभ कुमार यांचे वडील जनक राज यांनी रामला पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिवाळीच्या दिवशी (8 नोव्हेंबर) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गोपालपूर खडाना गावात घडली. कुमार त्यांचे भाऊ विनीत आणि मिंटू सोबत घराबाहेर फटाके फोडत होते. यावेळी तेथून जवळच राहणारा धीरज तिथे आला आणि त्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, "कुमारच्या कुटुंबाने फटाके फोडण्यावर धीरजने आक्षेप घेतल्याने वाद सुरू झाला. काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करून सुरुवातीला दोन्ही बाजूंना शांत केले होते, परंतु सौरभ यांनी विरोध केल्यावर वाद पुन्हा चिघळला."
आरोप आहे की, धीरजने गावठी पिस्तूलातून गोळी झाडली. ती भिंतीवर आदळल्यानंतर सौरभ यांच्या डोक्यात लागली. आरोपीचा भाऊ मोनू याने विनीतवर काठीने हल्ला केला. तक्रारीनुसार, कुटुंबाला धमकावून आरोपी तिथून पळून गेले.
पोलीस तपास
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी धीरज आणि मोनू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, आरोपींचं त्यांच्याशी जुनं वैर आहे अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे
रमाला पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक पूर्णेंदू सिंग यांनी या पथकांना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.