पंजाबमधील मानसा येथे अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची कथित विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअरच्या मालकाने त्याची गोळ्या झाडून हत्या केली. परविंदर सिंग झोटा असे या कार्यकर्त्याचे नाव होते. ते केमिस्टच्या दुकानांमधून अंमली पदार्थांची होणारी बेकायदेशीर विक्री उघडकीस आणण्यासाठी ओळखले जात असत. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी संबंधित केमिस्टला त्याच्या दुकानाबाहेर गाठून अंमली पदार्थांची विक्री करण्याबाबत जाब विचारला होता.
पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, परविंद सिंग एका वृद्ध व्यक्तीसोबत उभे असल्याचे आणि त्या व्यक्तीने या दुकानातून अंमली पदार्थ खरेदी केल्याचा दावा करत असल्याचे दिसत आहेत. त्यानंतर झोटा आणि दुकान मालक यांच्यात जोरदार वाद झाला. व्हिडिओमध्ये दुकानमालकाच्या हातात पिस्तूल असल्याचेही दिसत आहे.
"मार मुझे, मार मुझे" (मला मार, मला मार) असे ते वारंवार दुकानमालकाला म्हणत होते. "तू पिस्तूल का बाळगले आहेस?" असा प्रश्नही त्यांनी दुकानमालकाला विचारला. तसेच, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पोलिसांना बोलावण्यास आणि आणखी लोकांना जमा करण्यास सांगितल्याचेही ऐकू येत आहे.
🚨 Save Punjab from Drugs This is fucking scary, Anti-drug activists were shot at on camera while exposing the sale of Chitta (heroin) at a medical store https://t.co/j2X1R3NqlV
— Prayag (@theprayagtiwari) October 13, 2026
व्हिडिओमध्ये झोटा दुकानदाराला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर दुकानदाराने त्या वृद्ध व्यक्तीला विचारले की त्याने त्याच्याकडून 'ड्रग्ज' घेतले होते का? त्यावर परविंदर सिंगने "हो, आमच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग आहे," असे उत्तर दिले. हा वाद सुमारे चार मिनिटे चालला आणि त्यानंतर दुकानदाराने गोळीबार करून त्याची हत्या केली. गोळीबारानंतर त्याचा मोबाईल खाली पडला आणि त्यामुळे ते लाईव्ह रेकॉर्डिंग थांबले. दुकानाचा मालक सध्या फरार आहे.
परमिंदर अंमली पदार्थांच्या गैरवापरांविरुद्ध राबवत होते मोहीम
परमिंदर हे मानसा आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय होते. ते अंमली पदार्थांचा गैरवापर आणि काही वैद्यकीय दुकानांमधून (मेडिकल स्टोअर्स) होणारी नशिल्या पदार्थांची कथित बेकायदेशीर विक्री यांविरुद्ध आवाज उठवत होते.
फेसबुकवर 24 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या झोटा यांनी, अंमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे प्रसिद्धी मिळवली होती.
एका वैद्यकीय दुकानदाराशी संबंधित वादामुळे ते सर्वप्रथम 2023 मध्ये चर्चेत आले. त्या वर्षी 12 जुलै रोजी, झोटा आणि त्यांचे समर्थक व एक दुकानदार यांच्यात वाद झाल्याचे वृत्त होते. या वादानंतर पोलिसांनी परमिंदर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मारहाण, अनधिकृत प्रवेश आणि दंगल घडवणे यांसारख्या आरोपांखाली त्यांना जुलै 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली.