शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणावर आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोरील झालेल्या सुनावणीत संजय राऊत हे प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी कोर्टाने माफी हृदयातून मागितली जावी, मेंदूतून नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन अवमान प्रकरण सुरू आहे. यावेळी संजय राऊत स्वतः कोर्टासमोर हजर होते. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर याचिकाकर्त्याचे वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, 'संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. अल्बेनियाचे सुप्रीम कोर्ट जाळल्याचे ट्विट देखील राऊत यांनी केली होते. संजय राऊत जबाबदार व्यक्ती आहेत , त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही.'
याचिकाकर्त्यांनी बाजू मांडल्यानंतर संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागितली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टाला दिली. मात्र त्यावर कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. 'संजय राऊत तुम्ही वरिष्ठ राजकीय नेते आहेत, आम्ही तुमचे संसदेतील भाषणं आम्ही ऐकतो'. असं म्हणत, 'माफी हृदयातून मागितली जावी, मेंदूतून नाही. तुमच्याकडून जबाबदार वागणूक अपेक्षित आहे. तुमच्या शब्दप्रयोगात किती संयम आवश्यक आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवे. यात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करणे उचित ठरेल,' असं न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी म्हटलं आहे.
तसंच, सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत यांना अधिक चांगला माफीनामा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
संजय राऊत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ट्विट बाबत काही उल्लेख केला नाही. ते नेहमीच न्यायालयाबाबतीत असे बोलतात, लिहितात, असं याचिकाकर्त्यांच्या वतीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप राय यांनी कोर्टाला सांगितले होते. सरन्यायाधीशांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल संजय राऊत यांनी माफी मागितली होती, परंतु त्या ट्विटनंतरही त्यांनी न्यायालयाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करणे सुरूच ठेवले, असंही त्यांनी म्हटलं आहे.