वडिलांकडून 15 वर्षाच्या मुलाला थेट 2.30 कोटींची BMW भेट; कारण ऐकून वाटेल आश्चर्य; उगीच नाही देशभरात होतेय चर्चा!
पश्चिम बंगालमधील 15 वर्षीय मोहम्मद तलहाला नववीच्या सहामाही परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने वडिलांनी 2.30 कोटींची बीएमडब्ल्यू एम 4 कॉम्पिटीशन भेट दिली. या अनोख्या गिफ्टची देशभरात चर्चा होतेय.
आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हाव ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. यासाठी पालक मुलांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासन देतात. परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर मुलांना पालकांकडून कधी सायकल, मोबाइल किंवा आवडीची वस्तू भेट म्हणून देईन असा शब्द दिला जातो. मात्र, पश्चिम बंगालमधील एका व्यावसायिकाने मुलाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चक्क 2.30 कोटी रुपये किमतीची आलिशान बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. विशेष म्हणजे, मुलाने अद्याप नववीची वार्षिक परीक्षाही दिलेली नाही. सहामाही परीक्षेतील चांगल्या कामगिरीनंतर वडिलांनी त्याची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण केली. या अनोख्या भेटीची देशभरात चर्चा सुरू आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सहामाही परीक्षेतचं यशाचे महागडे बक्षीस
पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यातील गलसी परिसरातील पराज गावात ही घटना घडली. मोहम्मद तलहा हा 15 वर्षांचा मुलगा नववीच्या वर्गात शिकतो. त्याने सहामाही परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर त्याचे वडील शम्सुद्दीन मिद्या यांनी त्याला बीएमडब्ल्यू एम 4 कॉम्पिटीशन भेट देण्याचा निर्णय घेतला. तलहाला या कारची आधीपासूनच आवड होती आणि त्याने वडिलांकडे ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मुंबईतील अंधेरीमधून खरेदी केली बीएमडब्ल्यू
मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शम्सुद्दीन स्वतः मुंबईत आले. अंधेरी येथील शोरूममधून त्यांनी नवीन बीएमडब्ल्यू एम4 कॉम्पिटीशन खरेदी केली. या कारची किंमत सुमारे 2 कोटी 30 लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विशेष कंटेनरमधून ही कार पश्चिम बंगालमधील पराज गावात पोहोचवण्यात आली. गावात कार दाखल झाल्यानंतर ती पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही गर्दी केली.
कधीकाळी मुंबईत होते लाइटमन
शम्सुद्दीन मिद्या यांचा प्रवासही लक्षवेधी आहे. ते 2003 मध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले होते. येथे चित्रपटसृष्टीत लाइटमन म्हणून त्यांनी काम केले. जवळपास सात वर्षे मुंबईत राहिल्यानंतर 2010 मध्ये ते गावी परतले. त्यानंतर त्यांनी तांदळाचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्याचा विस्तार केला. आज गलसी परिसरात त्यांच्या तांदळाच्या गिरण्या असून, भारताबाहेरील बाजारपेठांमध्येही त्यांचा व्यवसाय पोहोचलाय.
घरात आधीपासूनच महागड्या गाड्यांचे कलेक्शन
शम्सुद्दीन यांना महागड्या गाड्यांची विशेष आवड आहे. त्यांच्या गाड्यांच्या संग्रहात रेंज रोव्हर, व्होल्वो, महिंद्रा थार आणि हुंदाई अल्काझार यांसारख्या गाड्यांचा समावेश असल्याचे वृत्तांत म्हटले आहे. आता या संग्रहात बीएडब्ल्यू M4 कॉम्पिटीशनची भर पडली आहे. त्यांच्या काही गाड्यांच्या नंबर प्लेटवरील शेवटचे तीन अंक 555 असल्याची बाबही वृत्तांत नमूद करण्यात आली आहे.
15 वर्षांचा तलहा कसा चालवणार कार?
या भेटीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तलहा अवघा 15 वर्षांचा आहे. त्यामुळे तो सध्या स्वतः कार चालवणार नाही, असंही त्याच्या पालकांनी स्पष्ट केलंय. आपण सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे तलहाने सांगितले आहे. आठवड्यातून एक दिवस या गाडीतून फिरण्याचा त्याचा विचार आहे. त्या वेळी वडील गाडी चालवतील मी त्यांच्या शेजारी बसून प्रवासाचा आनंद घेईन, असेही तो सांगतो. परीक्षेतील यशासाठी मिळालेल्या या महागड्या भेटीमुळे पूर्व बर्धमानमधील या कुटुंबाची चर्चा आता देशभर होत आहे.