SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये मोठी खुशखबर? बोनस वाढीसंदर्भात आली मोठी अपडेट!

सध्या कर्मचाऱ्यांसमोर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत—बोनस नेमका कधी जाहीर होणार आणि ₹7,000ची गणना मर्यादा ₹21,000पर्यंत वाढणार का?

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Sep 30, 2026, 09:53 PM IST | Updated: Sep 30, 2026, 10:12 PM IST
Image Credit: सध्या कर्मचाऱ्यांसमोर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत—बोनस नेमका कधी जाहीर होणार आणि ₹7,000ची गणना मर्यादा ₹21,000पर्यंत वाढणार का? कर्मचारी संघटनांकडून ₹21,000ची मागणी जोरात केली जात असली तरी अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे अधिकृत अधिसूचना येईपर्यंत ₹20,724 ही अपेक्षित रक्कम आहे, निश्चित बोनस नव्हे.
Join

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या बोनसची प्रतीक्षा आता वाढली आहे.2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रोडक्टीव्हीटी लिंक्ड बोनस (पीएलबी) कधी जाहीर होणार आणि त्याची गणना नेमकी किती रकमेवर होणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कर्मचारी संघटनांकडून यंदाचा बोनस सणासुदीपूर्वी, म्हणजे ऑक्टोबरमध्येच देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारने बोनसच्या प्रत्यक्ष पेमेंटची निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला बोनस मिळणार का?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसबाबत सध्या चर्चा जोरात सुरू आहे. कर्मचारी संघटनांना यंदा दसऱ्यापूर्वी बोनस मिळावा, अशी अपेक्षा आहे. विशेषतः पोस्टल विभागातील कर्मचारी संघटनांनी 2025-26 चा पीएलबी लवकर देण्याची मागणी केली आहे. जॉइंट काऊन्सिल ऑफ पोस्टल एमप्लॉयी(JCPE) ने 25 सप्टेंबर 2026 रोजी पोस्ट विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून सणासुदीपूर्वी बोनस देण्याची मागणी केली. काही संघटनांकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बोनस मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही तारीख अधिकृत नाही. केंद्र सरकारकडून बोनस पेमेंटबाबत अंतिम आदेश किंवा निश्चित तारीख जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष पेमेंट कधी होणार हे स्पष्ट होईल.

₹7,000 की ₹21,000? बोनसच्या गणनेचा मोठा मुद्दा

यंदाच्या बोनस चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणना मर्यादा सध्या बोनस गणनेसाठी ₹7,000 ही मर्यादा वापरली जाते. कर्मचारी संघटनांकडून मात्र ही मर्यादा वाढवून ₹21,000 करण्याची मागणी केली जात आहे. एनली-जेसीएम स्टाफ साईडने 27 ऑगस्ट 2026 रोजी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून बोनसची गणना ₹7,000 ऐवजी ₹21,000च्या मर्यादेवर करण्याची मागणी केली होती. संघटनांचा युक्तिवाद असा आहे की सध्याच्या किमान वेतनाच्या संदर्भात ₹7,000ची जुनी गणना मर्यादा वाढवण्याची गरज आहे.मात्र, ₹21,000ची मर्यादा लागू झाल्याची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ₹20,724 बोनस निश्चित मिळणार आहे, असे समजू नये.

₹7,000च्या आधारावर बोनस किती मिळतो?

सध्याच्या गणनेनुसार बोनसची रक्कम ₹7,000च्या आधारावर ठरवली जाते. 30 दिवसांच्या बोनससाठी साधारणपणे ₹7,000 ÷ 30.4 × 30 असे गणित केले जाते. यानुसार:₹7,000 ÷ 30.4 × 30 = ₹6,908. म्हणजे 30 दिवसांच्या बोनससाठी सध्याच्या ₹7,000 गणना मर्यादेनुसार अंदाजे ₹6,908 रक्कम होते. महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष मासिक पगारावर थेट आधारित नसते. पात्रता आणि संबंधित बोनस योजनेनुसार सरकारने निश्चित केलेल्या गणना पद्धतीचा वापर केला जातो.

₹21,000ची मागणी मान्य झाली तर बोनस किती होईल?

कर्मचारी संघटनांची ₹21,000ची मागणी सरकारने मान्य केली, तर त्याच 30 दिवसांच्या सूत्रानुसार गणना केल्यास रक्कम मोठ्या प्रमाणात वाढू शकते.गणित असे:₹21,000 ÷ 30.4 × 30 = ₹20,724. म्हणजे ₹21,000ची गणना मर्यादा लागू झाल्यास 30 दिवसांच्या बोनसची अंदाजे रक्कम ₹20,724 होऊ शकते.सध्याच्या ₹6,908च्या तुलनेत ही रक्कम जवळपास तीनपट आहे. मात्र हा केवळ प्रस्तावित ₹21,000 मर्यादेवर आधारित अंदाज आहे. सरकारने ही वाढ मंजूर केलेली नसल्याने ₹20,724 ही निश्चित बोनस रक्कम समजणे चुकीचे ठरेल.

PLB आणि साधा बोनस वेगळा; कर्मचाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बोनसचे प्रकार आणि पात्रता विभागानुसार वेगळी असू शकते. पीएलबी हा उत्पादन किंवा कामगिरीचे मोजमाप करता येणाऱ्या काही विभागांतील कर्मचाऱ्यांना लागू होतो. रेल्वे, पोस्ट आणि काही इतर विभागांमध्ये PLBची स्वतंत्र व्यवस्था आहे. तर काही पात्र ग्रुप सी आणि नॉन गॅझेटेड ग्रुप बी कर्मचाऱ्यांसाठी Ad-hoc किंवा Non-PLB बोनसची तरतूद असते. त्यामुळे प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्याला समान रक्कम मिळेलच असे नाही. विभाग, बोनसचा प्रकार, पात्र सेवाकाळ आणि लागू नियम यानुसार रक्कम बदलू शकते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES