MMS मुळे निलंबित झालेल्या अधिकाऱ्याची महिला पोलिसासोबत लग्नगाठ; 'त्या' प्रकरणाला वेगळं वळण!
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात निलंबित निरीक्षक नीरज तोमर यांचा महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत मंदिरातील व्हिडिओ समोर आहे. यात आपण लग्न केल्याचा दावा त्यांनी केलाय. काय घडलंय नेमकं? जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील पोलीस विभागाशी संबंधित एका प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पोलीस ठाण्याच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर झाल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले निरीक्षक नीरज तोमर आता एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबतच्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना जीवनसाथी मानून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. काही कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर विवाहाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेतही महिला कर्मचाऱ्याने दिले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधील व्हिडिओमुळे प्रकरण चर्चेत
बिजनौर जिल्ह्यातील वाढापूर पोलीस ठाण्याच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर झाल्याचे प्रकरण समोर आले होते. हा ग्रुप पोलीस ठाण्याशी संबंधित माहिती आणि कामकाजासाठी वापरला जातो. व्हिडिओ काही वेळाने हटवण्यात आला; मात्र तोपर्यंत काही कर्मचाऱ्यांपर्यंत तो पोहोचला होता. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
निरीक्षक नीरज तोमर निलंबित
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बिजनौरचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी चौकशीचे आदेश दिले. तपास पथकाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. चौकशी अहवालाच्या आधारे वाढापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी निरीक्षक नीरज तोमर यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरोधात विभागीय कारवाईही सुरू करण्यात आली.
मंदिरातील व्हिडिओमध्ये नेमकं काय?
निलंबनानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये नीरज तोमर आणि एक महिला पोलीस कर्मचारी मंदिराजवळ दिसत आहेत. दोघेही एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारल्याचे आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना दिसत आहेत. आम्ही एकमेकांना मानसिकदृष्ट्या जीवनसाथी मानल्याचे महिलेने व्हिडीओत सांगितले आहे. काही कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर विवाहाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा विचार असल्याचेही महिलेने सांगितले.
व्हिडिओ बनावट असल्याचा महिलेचा दावा
नव्या व्हिडिओमध्ये महिला पोलीस कर्मचारी काही लोकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करते. कथित बनावट व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचेही ती सांगते. दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करू नये, असे आवाहन केले आहे.