SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बिस्लेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित की असुरक्षित? कंपनी म्हणाली, 14 महिन्यापूर्वीच..., FSSAI च्या नोटीसबद्दलही खुलासा

बिस्लेरीचे पाणी पिण्यायोग्य नाही, असं अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) ने जाहीर केलं असून कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीकडून एक निवदेन जाहीर करत आपल्याला कुठलीही नोटीस मिळाली नाही, असं सांगितलंय.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 23, 2026, 11:13 IST | Updated: Nov 23, 2026, 11:20 IST
Image Credit: Bisleri
Join

बिस्लेरीचे पाणी पिण्यायोग्य नाही, असं दोन टेस्टच्या रिपोर्टनंतर समोर आल्याचे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) सांगितलं आहे. या रिपोर्टनुसार पाण्यातील ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यामुळे FSSAI ने कंपनीला नोटीस पाठवली असून त्यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या FSSAI ने पाठवलेल्या नोटीसंदर्भात बिस्लेरी कंपनीकडून निवदेन जाहीर करत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

बिस्लेरी कंपनीच्या निवेदनात काय आहे?

FSSAI च्या नोटीसबद्दल बिस्लेरी कंपनीच्या निवेदनात खुलासा देण्यात आला आहे. शिवाय कंपनीचे पाणी सुरक्षित असल्याचे सांगितलं आहे. त्यांनी या निवेदनात म्हटलं की, हे प्रकरण सुमारे 14 महिन्यांपूर्वीचे असून, सप्टेंबर 2025 मध्ये बिस्लेरीच्या गोव्यातील उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या एका बॅचशी संबंधित आहे. हा प्रकल्प आमच्या देशभरातील 143 उत्पादन प्रकल्पांपैकी एक आहे.

30 सप्टेंबर 2025 रोजी काय घडले?


30 सप्टेंबर 2025 रोजी FSSAI ने गोव्यातील उत्पादन प्रकल्पातून पाण्याचे सहा नमुने गोळा करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत सहापैकी पाच नमुने सर्व लागू मानकांनुसार योग्य आढळले. मात्र, सहाव्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण प्रतिलिटर 12 मायक्रोग्रॅम आढळले. हे प्रमाण निर्धारित मर्यादा असलेल्या प्रतिलिटर 10 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त होते. बिस्लेरीने या निष्कर्षाविरोधात अपील केल्यानंतर, 22 नोव्हेंबर 2025 रोजी FSSAI ने संबंधित नमुना पुन्हा तपासणीसाठी संदर्भ प्रयोगशाळेत पाठवला.

हेसुद्धा वाचा -  देशातील सर्वात मोठा पॅकेज्ड वॉटर ब्रँड बिस्लेरीच्या टेस्टचा हादरवणारा रिपोर्ट, कॅन्सरचे घटक...काय म्हणाले FSSAI?


दुसऱ्या तपासणीत काय आढळले?


संदर्भ प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत संबंधित पाण्याच्या नमुन्यातील ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. मात्र, याच तपासणीत नमुन्यामध्ये पॉलीन्यूक्लियर अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) असल्याचे स्वतंत्रपणे निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही तपासण्यांच्या निष्कर्षांमध्ये फरक असल्याने बिस्लेरीने याबाबत अधिक स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.बिस्लेरीने संबंधित नमुन्याची FSSAI मान्यताप्राप्त स्वतंत्र प्रयोगशाळेत पुन्हा तपासणी करण्याची व्यवस्था केली. या स्वतंत्र तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. बिस्लेरीने स्वतंत्र प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्ष 2 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत पत्राद्वारे FSSAI च्या पश्चिम विभागीय कार्यालयात सादर केले. या पत्रानंतर FSSAI कडून कोणताही पुढील पत्रव्यवहार प्राप्त झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघाले आहे, अशी कंपनीची समजूत झाली.

 

 

आजपर्यंत बिस्लेरीला ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष स्वरूपात कोणतीही नोटीस मिळालेली नाही. तसेच FSSAI च्या संकेतस्थळावरही माध्यमांमध्ये उल्लेख करण्यात आलेली नोटीस शोधता आलेली नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही बिस्लेरीसाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही उत्पादन प्रक्रियेत कठोर गुणवत्ता नियंत्रणाचे पालन करतो. आमच्या दहा टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेत 90 पेक्षा अधिक चाचण्या केल्या जातात. संबंधित प्रकरण योग्य नियामक प्रक्रियेद्वारे सोडवण्यासाठी आम्ही FSSAI सोबत सहकार्य करत राहू. अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला बिस्लेरी ब्रँड पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडबद्दल


50 वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेल्या बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील प्रमुख प्रीमियम पेय उत्पादक कंपन्यांपैकी एक म्हणून स्थान निर्माण केले आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँडची निर्मिती करणाऱ्या बिस्लेरीकडून पाण्याच्या शुद्धतेसाठी दहा टप्प्यांची प्रक्रिया आणि 90 गुणवत्ता चाचण्यांचे पालन केले जाते. कंपनीची मूलभूत मूल्ये ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी पाणी उपलब्ध करून देण्याशी संबंधित आहेत.


बिस्लेरी इंटरनॅशनलचे भारतात 143 कार्यरत उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीकडे 6,000 हून अधिक वितरक आणि 7,500 वितरण ट्रकचे मजबूत नेटवर्क आहे. कंपनी विविध प्रसंगांसाठी वेगवेगळ्या प्रकारची पेये तयार करते.

बिस्लेरी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरसोबतच कंपनीच्या उत्पादनांमध्ये पुढील ब्रँडचा समावेश आहे.
- वेदिका हिमालयन स्प्रिंग वॉटर
- बिस्लेरी लिमोनाटा
- बिस्लेरी पॉप
- बिस्लेरी सोडा
ही उत्पादने वेगवेगळ्या चवी आणि प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

याशिवाय, बिस्लेरी इंटरनॅशनलने बिस्लेरी डोअरस्टेप या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे घरपोच सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना त्यांच्या विश्वासातील ब्रँडचा सुरक्षित आणि अखंडित पुरवठा घरपोच मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे. बिस्लेरी इंटरनॅशनलची मूलभूत मूल्ये व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात जबाबदारीने काम करणे, विकास साधणे आणि शाश्वततेला प्राधान्य देणे ही आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES