Royal Enfield Himalayan 440 : रॉयल एनफिल्डची हिमालयन 440 बाईक नुकतीच लाँच झाली आहे. या बाईकने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. या बाईकला प्रचंड बुकिंग मिळाले आहे. कंपनीने या बाईकसाठीची बुकिंग तात्पुरती स्थगितही केली आहे. आता, कंपनी या बाईकचे नवे मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची टेस्टींग सुरु आहे.
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 बाईक एका टीव्ही जाहिरातीच्या (TVC) चित्रीकरणादरम्यान दिसली. ही बाईक यापूर्वीही अनेक वेळा दिसली आहे. अलीकडील फोटोंमधून बाईकच्या बॉडीवर्क, ग्राफिक्स आणि हार्डवेअरचे अनेक तपशील समोर आले आहेत.
हिमालयन 750 चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्रे, हिरवा, मरून आणि पांढरा या रंगांमध्ये येण्याची शक्यता आहे. ग्रे रंगासोबत ब्राऊन फिनिशसारखे काही रंगसंगतीचे पर्यायही उपलब्ध असतील. बाईकच्या बाजूला 750 आणि हिमालयन ग्राफिक्स असतील. रंगांविषयीचा अधिकृत तपशील सध्या अज्ञात आहे.
या बाईकमध्ये अलॉय आणि स्पोक व्हील्ससह विविध व्हील सेटअप्स मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 19-इंचाचे पुढचे आणि 17-इंचाचे मागचे चाक असू शकते. अधिकृत तपशील अद्याप उपलब्ध नाही.
हिमालयन 750 मध्ये होरिजेंटल लाइटिंगसह गोल हेडलॅम्प असेल. यात मोठी विंडस्क्रीन, बाजूच्या बॉडीवर्कवर इंडिकेटर्स आणि मोठी इंधन टाकी असेल. याव्यतिरिक्त, बाईकमध्ये स्टेप्ड सीट, मागील लगेज रॅक, गोल आरसे आणि खाली बसवलेला पुढचा मडगार्ड असेल.
या बाईकमध्ये 55 बीएचपी आणि 60 एनएम टॉर्कचे इंजिन असेल. जे 6 -स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. यामध्ये क्रूझ कंट्रोलसारखी वैशिष्ट्येही उपलब्ध असतील. नोव्हेंबर महिन्यात EICMA इव्हेंटमध्ये ही बाईक लाँच होईल अशी अपेक्षा आहे. भारतात, ही बाईक मोटरव्हर्समध्ये सादर केली जाऊ शकते.