शाळेच्या शिक्षकाचं डेटिंग अॅपवर जुळलं, लग्नासाठी कॅनडाहून भारतात आली महिला;प्रत्यक्षात पाहून मास्तरांना पश्चाताप; काय घडलं?
डेटिंग अॅपवर वर्षभर प्रेमसंबंध आणि लग्नाचे आश्वासन मिळाल्यानंतर 61 वर्षांची कॅनेडियन महिला भारतात आली. मात्र, राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. अखेर कॅनडाच्या दूतावासाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
ऑनलाइन डेटिंग अॅपवर सुरू झालेल्या ओळखीचे रूपांतर लग्नाच्या निर्णयात झाले. याच विश्वासाने कॅनडातील 61 वर्षीय महिला भारतात आली. हरियाणातील पानिपत येथील नितीन नावाच्या तरुणासोबत तिची जवळपास वर्षभरापासून डेटिंग अॅपवरून ओळख होती. सुरुवातीच्या संवादानंतर दोघे सोशल मीडियावरही संपर्कात आले. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. या निर्णयानंतर महिला 11 नोव्हेंबर 2026 रोजी टुरिस्ट व्हिसावर दिल्ली विमानतळावर दाखल झाली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
दिल्ली विमानतळावर आणायला गेला
महिला दिल्लीला पोहोचल्यानंतर नितीन स्वतः तिला घेण्यासाठी विमानतळावर गेला. तेथून तो तिला राजस्थानमधील कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातील नीमराना येथील बीबी बिल्डर्स सोसायटीमध्ये घेऊन आला. येथे त्याच्या मावसा-मावशीचे फ्लॅट असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघे जवळपास दोन दिवस या ठिकाणी एकत्र राहिले. लग्नाबाबत पुढील चर्चा सुरू असतानाच दोघांमधील नात्यात तणाव निर्माण झाला. ऑनलाइन संवादातून तयार झालेल्या नात्याची प्रत्यक्ष भेटीनंतर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती.
महिलेचे वय समजताच तरुणाला पश्चाताप
लग्नाची चर्चा पुढे जात असताना महिलेला सुमारे 61 वर्षे असल्याचे समोर आले. त्यानंतर नितीनने वयातील अंतराचा मुद्दा उपस्थित करत लग्न करण्यास नकार दिला. नितीनचे वय 31 वर्षे असून दोघांच्या वयात जवळपास 30 वर्षांचे अंतर असल्याने या निर्णयामुळे दोघांमध्ये वाद झाला. वर्षभर ऑनलाइन संवाद साधल्यानंतर लग्नाच्या अपेक्षेने भारतात आलेल्या महिलेसाठी हा मोठा धक्का होता.
कॅनडाच्या दूतावासाकडून पोलिसांना माहिती
13 नोव्हेंबर रोजी महिलेने कॅनडाच्या दूतावासाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. दूतावासाकडून स्थानिक पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर 14 नोव्हेंबरला पहाटे सुमारे चार वाजता नीमराना पोलीस बीबी बिल्डर्स सोसायटीमध्ये पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. नितीनला शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
महिलेला कॅनडाला पाठवण्याची तयारी
या घटनेनंतर कॅनडाच्या महिलेला कोटपूतली येथील कोर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी आणि मायदेशी परत पाठवण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि कॅनडाचे दूतावास यांच्यात समन्वय सुरू आहे. नितीन हा पानिपतचा रहिवासी असून खासगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती नीमराना पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.