मोदी सरकारचा कॅन्सरवरील औषधांसंदर्भात मोठा निर्णय! सर्वसामान्यांची वर्षाला ₹2500 कोटींची बचत
भारत सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लाखो कर्करोग रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारने सर्व विना नियंत्रित कॅन्सर औषधांच्या ट्रेड मार्जिनवर 30 टक्क्यांची कमाल मर्यादा लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळं कॅन्सरच्या औषधांच्या कमाल किरकोळ विक्री किंमतीत थेट 70 टक्क्यांपर्यंतची घसरण होण्याची शक्यता आहे.
सरकारचा हा निर्णय केवळ कर्करोगाच्या औषधांपूरताच मर्यादित नाही. यामध्ये ब्रँडेड आणि जेनेरिक अशा दोन्ही प्रकारच्या व अनुसूचीत नसलेल्या कर्करोगाविरोधी औषधांचा समावेश असेल. तसंच, आयात केलेली आणि भारतात उप्तादित केलेली दोन्ही प्रकारची औषधे यात समविष्ट असतील. त्याचबरोबर हा नियम पेटंट असलेल्या आणि पेटंट नसलेल्या दोन्ही प्रकारच्या औषधांसांठी लागू होणार आहे.
औषधांच्या विक्री आणि वितरणादरम्यान आकारला जाणारा अवाजवी नफा कमी करणे, हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसंच, किंमती कमी होऊनही बाजारात कर्करोगाच्या औषधांची उपलब्धतात निर्माण करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अधिकृत सरकारी अंदाजानुसार, सरकारच्या या निर्णयामुळं कॅन्सर रुग्णांची दरवर्षी अंदाजे 2,500 कोटींची बचत होऊ शकते. दीर्घकाळ चालणारे उपचारांसाठी महागड्या औषधांची आवश्यकता असते, त्यामुळं या रुग्णांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.
अनेक अशी प्रकरणे असतात ज्याचे उपचार दीर्घकाळ चालणारे असतात. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन आणि औषधे यांचा एकत्रित खर्च कुटुंबावर मोठे आर्थिक ओझे ठरू शकतो. त्यामुळं औषधांची किंमत कमी केल्यामुळं दिलास मिळू शकतो.
महागड्या औषधांवरच केंद्र सरकारचे लक्ष का?
औषध निर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नियम मुख्यत्वे महागड्या कॅन्सर औषधांवरच केंद्रित केला जात आहे. जर स्वस्त औषधांवरही 30 टक्क्यांची मर्यादा लादली, तर कंपन्यांना त्यांचे विपणन आणि वितरण परवडणार नाही आणि त्या बाजारातून गायब होण्याची भीती आहे. त्यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम न होता रुग्णांना जास्तीत जास्त आर्थिक दिलासा मिळावा, यादृष्टीने हे धोरण आखण्यात आले.
ट्रेड मार्जिन मर्यादा : 30%
औषधांच्या किमतीत होणारी कपात : 70% पर्यंत
रुग्णांची वार्षिक बचतः सुमारे 2,500 रुपये कोटी
सवलत मिळणारी एकूण औषधे : 110 औषधे
आदेश लागू होण्याचा कालावधी : 10 दिवस