सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सेटलमेंट खात्यातून सुमारे 14 कोटी रुपयांचे कथित अनधिकृत व्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अवघ्या तीन दिवसांत 187 व्यवहारांद्वारे ही रक्कम 36 बँकांमधील खात्यांकडे वळवण्यात आल्याची तक्रार बँकेने केली आहे. या प्रकरणी मुंबईतील नोडल सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
कथित अनधिकृत व्यवहार 15 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत झाले. 15 ऑक्टोबरला सहा, 16 ऑक्टोबरला 88 आणि 17 ऑक्टोबरला 93 व्यवहार झाल्याची तक्रार बँकेने केली आहे. या व्यवहारांतून एकूण सुमारे ₹13.97 कोटी 36 बँकांमधील खात्यांकडे वळवण्यात आल्याचा आरोप आहे.
बँकेच्या तक्रारीनुसार, अंतर्गत तपासणीदरम्यान या 187 व्यवहारांची नोंद शाखा, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग तसेच कोअर बँकिंग सिस्टममध्ये आढळली नाही. आरटीजीएस सेटलमेंट खात्याच्या आणि बँकेच्या आर्थिक संदेशवहन प्रणालीच्या नोंदींमध्येही संबंधित व्यवहारांचा पूर्ण तपशील सापडला नसल्याचे सांगण्यात आले.
बँकेच्या आरोपानुसार, अज्ञात व्यक्तींनी इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस (IFTAS) या रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीच्या केंद्रीय SFMS सर्व्हरपर्यंत अनधिकृत प्रवेश मिळवला असावा. SFMS म्हणजे बँकांदरम्यान आर्थिक व्यवहारांचे संदेश पाठवण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली. RTGS व्यवहारांच्या प्रक्रियेत या प्रणालीची भूमिका महत्त्वाची असते.
बँकेने २६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. बँकेच्या स्थानिक आरटीजीएस सर्व्हरच्या इंटरफेसमध्ये तांत्रिक समस्या आढळली होती. ग्राहकांची वैयक्तिक खात्यांवर परिणाम झालेला नाहीत. कोअर बँकिंग सिस्टम सुरक्षित असल्याचे बँकेने म्हटले आहे. आरटीजीएस सेवा सर्व माध्यमांतून पुन्हा सुरू झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
बँकेच्या तक्रारीनंतर मुंबईतील नोडल सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. व्यवहार कुठल्या खात्यांमध्ये गेले, त्यामागे कोण आहे आणि कथित अनधिकृत प्रवेश कसा झाला, याचा तपास सुरू आहे. बँकेने रिझर्व्ह बँक, आयएफटीएएस आणि संबंधित सायबर सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली.