10 लाखांची लाच घेतना CGST अधिकारी रंगेहाथ पकडलं, घरावर छापा मारल्यावर 24 लाख कॅश, सोन्याचे दागिने, विटा अन् चांदी
एका CGST अधिकाऱ्याला 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्या घरावर छापा मारल्यावर कुबेराचा खजिनालाही लाजवेल एवढं घबाड सापडलं.
एक सीजीएसटी अधिकाऱ्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 10 लाखांची लाच घेताना त्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलंय. यानंतर त्या अधिकाऱ्याच्या घरावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने छापा टाकल्यावर अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे धक्कादायक प्रकरण हरियाणातील पंचकुलामधील आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातून अंदाजे 1.86 कोटी रुपयांची रोकड, विदेशी चलन, सोने आणि चांदी जप्त केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकाऱ्याचे नाव लवकुश कुमार असं आहे. सीबीआयने त्याला अटक असून 19 नोव्हेंबर 2026 रोजी आरोपी अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी कंपनीविरुद्धच्या जीएसटी कार्यवाहीत अवाजवी फायदा मिळवून देण्याच्या बदल्यात बेकायदेशीर लाच घेतल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी पंचकुला इथे सीबीआयने लावलेल्या सापळ्यात, आरोपी तक्रारदाराकडून 10 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला.
शुक्रवारी 20 नोव्हेंबर 2026 रोजी त्या अधिकाऱ्याच्या घरी पुन्हा झाडाझडती घेण्यात आली. त्या शोधमोहिमेत, अंदाजे ₹24.29 लाख किमतीचे भारतीय चलन, अंदाजे ₹15.65 लाख किमतीचे विदेशी चलन, आणि अंदाजे ₹1.46 कोटी किमतीचे सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि चांदी जप्त करण्यात आली. परिणामी, जप्त केलेल्या मालाचे एकूण मूल्य अंदाजे ₹1.86 कोटी आहे.
त्यासोबत सहा बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे, एक गुंतवणूक पोर्टफोलिओ, एक जीवन विमा पॉलिसी आणि अनेक स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच, एक वाहन, आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांची मालमत्ता, गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार निश्चित करण्यासाठी जप्त केलेल्या आर्थिक आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्याने दिली आहे.