नववीच्या सहामाहीमध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून वडिलांनी गिफ्ट केली ₹2.30 कोटींची BMW; मुंबईला आले अन्...
सध्या या कारचे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून ही कार भेट देणाऱ्या वडिलांनी आणि त्यांच्या मुलाने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात नातेवाईकांनी किंवा पालकांनी कौतुकाची थाप म्हणून तुम्हालाही कधी न कधी बक्षीस दिलं असेल. हे बक्षीस चॉकलेट, कपडे किंवा आवडत्या वस्तूच्या स्वरुपात देण्यात आलं असेल. मात्र पश्चिम बंगालमध्ये एका शाळकरी मुलाला त्याच्या वडिलांनी चक्क बीएमडब्यू कार परीक्षेत पास झाल्याबद्दल गिफ्ट म्हणून दिली आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा काही 10 वी, 12 वी ची नव्हती तर नवव्या इयत्तेमधील सहामाही परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल दिली आहे. या बीएमडब्यूची किंमत 2 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे. 'बीएमडब्ल्यू'चं हे 'एम 4 कॉम्पिटिशन' मॉडेल आहे.
कार घेण्याच्या निर्णयाबद्दल काय म्हणाले?
मिळालेल्या माहितीनुसार, ही अनोखी भेट शमसुद्दीन मिद्या नावाच्या व्यापाऱ्याने त्याचा मुलगा मोहम्मद तल्हा याला भेट दिली आहे. शमसुद्दीन मिद्या हे पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यातील गल्सी येथील 'पराज' भागात वास्तव्यास आहेत. मुलाने नववीच्या परीक्षेत सहामही परीक्षेत मिळेवल्या यशाबद्दल ही कार भेट देताना मुलाला मागील बऱ्याच काळापासून स्पोर्ट्स कार हवी होती असं म्हटलं आहे. मोहम्मद तल्हा याला मागील काही काळापासून 'बीएमडब्ल्यू एम 4 कॉम्पिटिशन' घ्यायची इच्छा होती. त्याची हीच इच्छा त्याच्या वडिलांनी नववीच्या सहामाही परीक्षेतील त्याचे चांगले गुण पाहिल्यानंतर लगेच पूर्ण केली. शमसुद्दीन हे स्थानिकामध्ये व्यावसायासंदर्भातील अनोख्या उपक्रमांबरोबरच आणि महागड्या गाड्यांची आवड असलेली व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे आधीपासूनच रेंज रोव्हर, व्होल्वो, महिंद्रा थार आणि ह्युंदाई अल्काझार सारख्या गाड्यांचा ताफा आहे. आता या यादीमध्ये'बीएमडब्ल्यू एम4 कॉम्पिटिशन'चीही भर पडली आहे.
मुंबईहून पश्चिम बंगालला नेली कार
विशेष म्हणजे व्यापारी असलेले शमसुद्दीन हे त्यांच्या लाडक्या मुलाला हवी असलेली 'बीएमडब्ल्यू एम 4 कॉम्पिटिशन' कार खरेदी करण्यासाठी कोलकात्याहून मुंबईला आले होते. मुंबईमधील आलिशान शो रुममध्ये या कारची ऑर्डर दिल्यानंतर काही आठवड्यांनी ही 2.30 कोटींची कार पूर्व बर्धमानमध्ये पोहचली आहे. या कारचा रंग आणि ती भेट देण्यामागील कारणामुळे ही कार सध्या स्थानिकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे.
मुलगा काय म्हणाला?
शमसुद्दीन यांनी आपल्याला मुलाची इच्छा पूर्ण करण्याइतकं सामर्थ्य दिल्याबद्दल देवाचे आभार मानले. तसेच मुलाच्या इच्छेसाठी ही कार त्याला गिफ्ट केली असून तो अभ्यासात खूप हुशार असल्याचंही शमसुद्दीन आवर्जून म्हणाले. मोहम्मद तल्हाने या गिफ्टबद्दल बोलताना, "एवढं महाग गिफ्ट मिळाल्याचा आनंद होतोय. पण सध्या मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे. वडिलांशेजारी बसून नवीन बीएमडब्ल्यू कारमधून आठवड्यातून एकदा फेरफटका मी नक्की मारणार आहे," असं म्हटलंय.
मुलगा नाही चालवणार कार
2.30 कोटी रुपयांची आलिशान कार भेट मिळाल्याने मोहम्मद तल्हाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र परंतु सध्या मोहम्मद तल्हा स्वतः ही कार चालवणार नाही. मोहम्मद तल्हा अजून अल्पवयीन आहे. सध्या मोहम्मद तल्हाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे, त्याचे वडीलच पुढील काही वर्ष ही कार चालवणार आहेत.
नंबर्सचीही हौस
नववीमधील कामगिरीसाठी लेकाला बीएमडब्यू घेऊन देणाऱ्या शमसुद्दीन यांना गाड्यांच्या विशेष नंबर्सचंही आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे स्पेशल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नंबर प्लेट असलेल्या कार्स आहेत. त्यांच्या कारचे शेवटचे चार नंबर 555 असे आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या कार्सचे नंबरही 555 ने संपतात.