काँग्रेस आमदाराचा तुफान राडा! स्टेजवरुनच माईक फेकून मारला, नंतर खुर्ची उचलून अंगावर फेकली; CM ना म्हणाला 'भित्रे...'
कार्यक्रम सुरु असतानाच काँग्रेसच्या आमदाराने तुफान राडा घातल्याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी आमदाराने थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करताना आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचं आव्हानही दिलं.
काँग्रेसच्या आमदाराने कार्यक्रमात तुफान राडा घातल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. मंचावर बोलत असतानाच काँग्रेस आमदाराने आपला संयम गमावला आणि थेट माईक फेकून मारला. इतक्यावरच आमदार थांबला नाही, तर त्याने खाली जाऊन खूर्ची उचलून फेकत हात उचलण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान त्याचे समर्थकही स्टेजवर चढले आणि पोडियम फेकण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. उत्तराखंडमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या देशात चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
नेमकं काय घडलं?
झालं असं की, उत्तराखंडमधील जौलजीबी जत्रेत (Jauljibi Fair) काँग्रेसचे आमदार हरीश सिंग धामी ( Harish Singh Dhami) यांनी, आपल्याला बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप करत मोठा गोंधळ घातला. त्यांनी आपला माईक भिरकावून दिला, खुर्ची उचलली आणि उपस्थित लोकांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना त्यांना 'भित्रा' म्हटलं. तसंच त्यांना धारचुला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.
पिथौरागढ जिल्ह्यातील ऐतिहासिक जौलजीबी जत्रेत शनिवारी राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. काँग्रेसचे आमदार हरीश सिंग धामी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्र्यांना 'भित्रा' म्हटलं आणि त्यांना आगामी निवडणुकीत धारचुला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं खुलं आव्हान दिलं.
मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यानंतर काही वेळातच हा सगळा प्रकार घडला. अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेले हरीश धामी यांनी आरोप केला की, त्यांना उपस्थितांसमोर बोलण्याची संधी दिली गेली नाही. माईक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या हरीश धामी यांनी तो माईक साऊंड सिस्टीम हाताळणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने भिरकावला, ज्यामुळे तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला.
काँग्रेस आमदाराचा खुर्चीने हल्ला करण्याचा प्रयत्न
आमदार इतके संतापले होते की, मंचावरून खाली उतरुन खुर्ची उचलली आणि साऊंड सिस्टीमजवळ उपस्थित लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका व्यक्तीची कॉलर पकडून त्याला कानाखाली मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र ती व्यक्ती मागे सरकल्याने बचावली.
यादरदरम्यान, त्यांच्या समर्थकांनीही या वादात उडी घेतली आणि मंचावर गोंधळ घातला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाद अधिक वाढण्यापासून रोखला.
हरीश धामी यांचे मुख्यमंत्र्यांना धारचुला मतदारसंघातून लढण्याचे आव्हान
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासोबतचा राजकीय संघर्ष अधिक तीव्र करत, हरीश धामी यांनी त्यांना धारचुला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. त्यांनी असा दावा केला की, तिथले मतदार त्यांना धडा शिकवतील. काँग्रेस आमदाराने म्हटले की, जर त्यांच्या पक्षाने जबाबदारी दिली, तर ते कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आणि मुख्यमंत्र्यांचा पराभव करण्यास तयार आहेत.