सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेतेही सुरक्षित नाहीत की काय असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आला आहे. कानपूर येथे सोमवारी रात्री बुरखा घातलेल्या दोन घुसखोरांनी भाजपच्या 57 वर्षीय ज्येष्ठ नेत्याला त्याच्या फार्महाऊसवर ओलीस धरले. या नेत्याचे हात-पाय बांधून त्याला बाथरूममध्ये कोंडले आणि घरातील सामान घेऊन पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रमेश सिंह यादव असे या नेत्याचे नाव आहे. रमेश यांनी स्वतःची सुटका करून घेतली. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकांना सावध केले. पोलिसांना या घटनेसंदर्भात कळवल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
चोरींनी काय काय पळवलं?
रमेश यांनी या प्रकरणासंदर्भातील संपूर्ण घटनाक्रमाबद्दल सांगताना, "गुन्ह्यानंतर आरोपी संरक्षक भिंत ओलांडून पळून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ते फार्महाऊसमध्ये कसे घुसले हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी फार्महाऊसमध्ये प्रवेश केल्याचे कोणतेही फुटेज अद्याप मिळालेले नाही," असे सांगितले. हल्लेखोर नेमके काय घेऊन गेले आहेत, याचीही आम्ही अजून खात्री करत असल्याचं रमेश सिंह म्हणाले. मात्र, हल्लेखोरांनी माझी सोन्याची चैन, ब्रेसलेट आणि जवळ असलेली सुमारे 9 लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याचा दावा सिंह यांनी केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एकूण 50 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं सांगण्यात येत आहे.
'माझे हात-पाय बांधले अन्...'
रमेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सोमवारी रात्री लखनौहून परतले आणि नेउरी गावातील आपल्या फार्महाऊसवर पोहोचले. गेटबाहेर काही स्थानिक रहिवासी बसले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते मुख्य गेटपासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या एका खोलीत गेले. "खोलीचा दरवाजा उघडा होता... अचानक, काळ्या कापडाने चेहरा झाकलेले दोन जण आत घुसले आणि त्यांनी माझ्या दिशेने गावठी पिस्तूल रोखले. त्यांनी माझे हात, पाय आणि तोंड बांधले आणि मला बाथरूममध्ये कोंडले," असे सिंह यांनी घडलेल्या घटनेचा तपशील देताना सांगितले. फार्महाऊसच्या गेटवर चार सुरक्षारक्षक तैनात असतात, असेही त्यांनी सांगितले. कानपूरचे पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस फार्महाऊसच्या संरक्षक भिंतीवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासत आहेत.
45 मिनिटांनंतर धडपड सुरु
बाथरूममध्ये कोंडल्यानंतर सुमारे 45 मिनिटांनंतरही खोलीतून कोणताही आवाज न आल्याने त्यांनी पायाला बांधलेली पॉलिथिनची पट्टी तोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. "हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेतच मी खोलीतून बाहेर आलो. सुरक्षारक्षकाने मला पाहताच मला सोडवलं आणि त्वरित पोलिसांना कळवले," असे रमेश सिंह म्हणाले.
या नेत्याबद्दल थोडक्यात
बिधूनू येथील तीन वेळा 'ब्लॉक प्रमुख' राहिलेले रमेश सिंह हे भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे प्रदेश सचिव आहेत. त्यांनी 2022 ची विधानसभा निवडणूक कानपूरमधील बिठूर मतदारसंघातून लढवली होती, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता.