जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबा म्हणजेच LeT या दहशतवादी संघटनेचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याला चकमकीत ठार केलं होतं. ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. या कारवाईनंतर केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ महासंचालक जी. पी. सिंह यांनी सोशल मीडियावर केलेली एक सूचक पोस्ट चर्चेत आली आहे. सम डिशेस आर बेस्ट सर्व्ह कोल्ड, इव्हन कोल्ड वेदर असं त्यांनी म्हटलं. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
18 नोव्हेंबर रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील झांगलपोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली. जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परिसराला घेराव घालण्यात आला. या संयुक्त कारवाईत जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दल सहभागी होते. या कारवाईदरम्यान लतीफ भट एका मशिदीत लपल्याची माहिती समोर आली होती. यानंतर सीआरप झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
Congratulations guys. Some dishes are best served cold, even in cold weather.
— GP Singh (@gpsinghips) November 18, 2026
कुलगामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनायत अली यांनी यासंदर्भात अपडेट दिली. सुरक्षा दलांनी लतीफ भटला शरण येण्याची अनेकदा विनंती केली होती. त्याच्याशी व्हिडीओ कॉलद्वारेही संवाद साधण्यात आला. त्याचं वय कमी असून पुढे संपूर्ण आयुष्य असल्याचं सांगत शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र, त्याने नकार दिला. त्यानंतर मशिदीतून गोळीबार सुरू केल्याने चकमक तीव्र झाली. धार्मिक स्थळाचं कमीत कमी नुकसान व्हावं, यासाठी सुरक्षा दलांनी संयम बाळगल्याचं पोलिसांनी सांगितलं.
लतीफ भट मारला गेल्यानंतर सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली. कॉन्ग्रॅच्युलेशन गाईज, सम डिशेस आर बेस्ट सर्व्ह कोल्ड, इव्हन कोल्ड वेदर असं त्यांनी लिहिलं. या पोस्टमधील 'काही गोष्टींचा हिशेब थंड डोक्यानेच चुकता केला जातो' या अर्थाच्या सूचक विधानाची चर्चा सुरू झाली आहे. या कारवाईत सहभागी सुरक्षा दलांचं त्यांनी अभिनंदन केलं.
11 नोव्हेंबर रोजी कुलगाममधील अखरान परिसरात सीआरपीएफच्या नाक्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले होते. लतीफ भट आणि त्याचा साथीदार उमर निसार दार यांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. हल्ल्यापूर्वी दोघांनी परिसरातील काही ठिकाणांची रेकी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
लतीफ भटचा शोध सुरू असताना 16 नोव्हेंबर रोजी कुलगाममधील लारू परिसरात सुरक्षा दलांची त्याच्याशी आणि साथीदार उमर निसार दार याच्याशी चकमक झाली होती. या कारवाईत उमर निसार दार मारला गेला; मात्र लतीफ भट पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली. अखेर 18 नोव्हेंबरला लतीफ भटचा खात्मा करण्यात आला.