दिल्लीतील दक्षिण-पश्चिम भागातील बिंदापूर परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर एका तरुणाच्या मृत्यूत झाले. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून कथितपणे फेकलेला भरलेला एलपीजी सिलिंडर खाली उभ्या असलेल्या तरुणाच्या डोक्यावर पडला. या घटनेत साहिल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात शिवम शर्मा याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दक्षिण-पश्चिम दिल्लीतील बिंदापूर एक्स्टेंशनमधील तलाव वाला पार्क परिसरात शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. साहिल इमारतीच्या बाहेर उभा असताना तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून भरलेला एलपीजी सिलिंडर खाली आला. तो थेट साहिलच्या डोक्यावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमागील वादाबाबत वेगवेगळे दावे समोर आले आहेत. इमारतीच्या पार्किंगमध्ये शिवम शर्मा आणि अन्य रहिवाशांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या शिवमने वर जाऊन सिलिंडर खाली फेकल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे शिवम आणि त्याच्या आईमध्ये वाद झाल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे वादाचे नेमके कारण आणि सिलिंडर खाली कसा आला?, याबाबत पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपीची ओळख शिवम शर्मा अशी झाली आहे. तो त्याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो बिंदापूरमधील एका कारखान्यात टेलरिंगचे काम करतो. घटनेच्या दिवशी तो मद्यप्राशन करून असल्याचा आरोप करण्यात आलाय.
साहिल याच इमारतीत कुटुंबासह राहत होता. त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा आणि आई असा परिवार आहे. तो आठवडी बाजारात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील रहिवाशांमध्येही या घटनेची चर्चा सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केले. घटनास्थळावरील परिस्थिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सिलिंडर जाणीवपूर्वक फेकण्यात आला की वादादरम्यान तो खाली पडला, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.