SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मोदींच्या चेहऱ्यावरून, शारीरिक हालचालींवरून जाणवते की ते...', राऊतांचा हल्लाबोल; प्रती खासदार ₹150 कोटी उल्लेख करत म्हणाले, 'या हरामखोरीस...'

1976 साली इंदिरा गांधी यांनी हे विधेयक 25 वर्षांसाठी पुढे ढकलले होते. पुढे 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनीही हेच विधेयक पुढच्या 25 वर्षांसाठी म्हणजे 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेचा निकाल प्रसिद्ध होईपर्यंत टाळले.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 29, 2026, 06:41 IST | Updated: Nov 29, 2026, 06:55 IST
Image Credit: राऊत यांचा डिलिमिटेशनवरुन हल्लाबोल (प्रातिनिधिक फोटो)
Join

"दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हालचाल असते, पण एरवी नोव्हेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन घेण्याच्या मनःस्थितीत मोदी-शहा नाहीत. संसदेपासून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. सरकारने हिवाळी अधिवेशन साफ गुंडाळले, परंतु तीन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याचा अट्टहास मात्र आता पूर्ण केला आहे. संसदेच्या बाबतीत ही मनमानी म्हणजेच हुकूमशाही आहे. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचे तर 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज सुरू करण्याची विनंती सरकारने लोकसभा अध्यक्षांना केली आहे. अधिवेशनाला घाबरून पळणारे हेच सरकार ‘850’ खासदारांचे ओझे वाहणारे ‘डिलिमिटेशन’ विधेयक आणायला निघाले आहे, हे आश्चर्य आहे," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला आहे. 

सरकार विरोधकांच्या खांद्यावर हात ठेवून विश्वासाने चर्चा करायला तयार नाही

"जोपर्यंत 850 खासदारवाले डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्याची शक्यता दिसत नाही तोपर्यंत संसदेचे अधिवेशन घेणार नाही हा मोदी-शहांचा अट्टाहास लोकशाहीविरोधी आहे. 2026 चे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित (adjourned sine die) होऊन 100 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला, पण संसदेचे सत्रावसान (prorogation) झालेले नाही. हा संसदीय ‘पेच’ आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेची सरकारकृत कोंडी करण्याचा हा प्रकार अद्भुत आहे. संसदेचे एक अधिवेशनच ‘व्होट चोरी’प्रमाणे चोरण्यात आले. मोदी-शहांनाच हे जमू शकते. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी 850 खासदारांसाठी नवे संसद भवन उभारले. त्या भवनाची रचनाही गोंधळ वाढवणारी आहे. 850 खासदारांची योजना करणारे संविधान संशोधन विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताच्या जोडतोडीत मोदी-शहा गुंतले आहेत. शहा जंग जंग पछाडत आहेत. पुन्हा जे नवे विधेयक ते आणू इच्छित आहेत, त्यात काय ठासून भरले ते कोणीच सांगू शकत नाही. जुने विधेयक 17 एप्रिल 2026 रोजी भारी बहुमताने कोसळले, पण हे लोकशाहीविरोधी विधेयक कोसळले तरी मोदी-शहा थांबायला तयार नाहीत. जणू 850 खासदारांचे विधेयक मंजूर झाले नाही तर भारतवर्षावर आकाशच कोसळून पडेल. या प्रश्नावर सरकारला विरोधी पक्षाचा पाठिंबा हवा आहे, पण सरकार विरोधकांच्या खांद्यावर हात ठेवून विश्वासाने चर्चा करायला तयार नाही," असं राऊत यांनी 'रोखठोक' सदरामध्ये म्हटलं आहे.

असे आव्हानच त्यांनी दिले आहे

"काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना आतापर्यंत चार पत्रे पाठवली. सर्वपक्षीय बैठक घेऊन या सगळ्या विषयांवर चर्चा करा, पण पंतप्रधान मौन बाळगून आहेत. डिलिमिटेशन विधेयकापेक्षा अनेक चिंताजनक विषय देशासमोर आहेत. त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. 850 खासदारवाले विधेयक पुढे ढकलता येणे शक्य आहे, पण मोदी-शहांच्या नाकावर या विधेयकाचा ‘ईगो’ चमकत आहे. हे विधेयक मंजूर करून घेऊच असे आव्हानच त्यांनी दिले आहे," असं राऊत म्हणालेत. 

पंतप्रधानांचे मानसिक स्वास्थ्य बरे नसावे

"डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुर्नरचना विधेयकासाठी मोदी-शहांचे प्राण जणू कंठास लागले आहेत. 1976 साली इंदिरा गांधी यांनी हे विधेयक 25 वर्षांसाठी पुढे ढकलले होते. पुढे 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनीही हेच विधेयक पुढच्या 25 वर्षांसाठी म्हणजे 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेचा निकाल प्रसिद्ध होईपर्यंत टाळले. यातच राष्ट्रहित, नैतिकता आणि विवेकशीलता होती, पण पंतप्रधान मोदींचा या तिन्ही गोष्टींशी संबंध दिसत नाही. 19 नोव्हेंबरला उद्योगपतींच्या संमेलनात मोदी यांनी प्रथमच कबुली दिली की, देशावर आर्थिक संकट घोंघावत आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. उद्योगपतींना त्यांनी विचारले, आम्ही तुमच्यावर सवलतींचा पाऊस पाडला, पण नोकऱ्या कोठे आहेत? गुंतवणूक कोठे आहे? हे असे महत्त्वाचे प्रश्न असताना पंतप्रधान डिलिमिटेशन बिलांसाठी अडून बसले आहेत. पंतप्रधानांचे मानसिक स्वास्थ्य बरे नसावे व ते तणावाखाली आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून आणि शारीरिक हालचालींवरून जाणवते. अशा व्यक्तीने अनावश्यक अशा डिलिमिटेशन विधेयकासाठी डोके फोडून घ्यावे हे योग्य नाही," असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. 

या हरामखोरीस काय म्हणावे?

"आजही मोदी-शहा विरोधकांना तुच्छ लेखतात व तुमच्या मदतीशिवाय इतके महत्त्वाचे विधेयक मंजूर करून दाखवू असे सांगतात ते धमक्या व घोडेबाजाराच्या जोरावर. त्यासाठी अमित शहा यांनी जो ‘यज्ञ’ मांडला आहे त्यात अनेक पक्ष व अनेक पक्षांतील खासदारांच्या समिधा पडतील. ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’च्या धर्तीवर भाजपचा ‘नॅशनल घोडेबाजार स्टॉक एक्सचेंज’ आहे. त्या स्टॉक मार्केटमध्ये खासदारांचा भाव 100 ते दीडशे कोटी इतका लावला गेला आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी साधारण 40 खासदार कमी पडत आहेत. विविध पक्षांतील खासदारांनी प्रत्येकी दीडशे कोटींच्या बदल्यात क्रॉस व्होटिंग करावे. विधेयक मंजूर करावे अशी मोदी-शहांची योजना आहे. काही लहान पक्षांशी याबाबत थेट ‘डील’ झाले आहे. अमित शहा याच डीलसाठी सध्या वारंवार मुंबईत येत आहेत व देशभरातील खासदारांचे भाव ठरवत आहेत. या ‘डील’साठी लागणारे शेकडो कोटी शेवटी मुंबईतील बिल्डर आणि काही मंत्री जमा करून देणार ही गोष्ट उघड आहे. 850 खासदारांसाठी सुरू असलेला हा घोडेबाजार देशाच्या लोकशाहीची प्रतिष्ठा नष्ट करणारा आहे. देशभरातील खासदार जाळय़ात ओढण्यासाठी दीडशे कोटींचा भाव, या हरामखोरीस काय म्हणावे? ममता बानर्जी यांचे उरलेले खासदार, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील खासदार भाजपच्या या ‘नॅशनल घोडेबाजार स्टॉक एक्सचेंज’मध्ये सामील होतात काय तेवढेच आता पाहायचे," असं म्हणत राऊत यांनी आपला शाब्दिक संताप व्यक्त केलाय.

आम्हाला हा असा भारत नको

"भारतीय लोकशाहीचा उडालेला सध्याचा बोजवारा दुःखद आहे. सत्ता हातात राहावी म्हणून राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी किती खालची पातळी गाठावी? भारतीय संसदेची संपूर्ण रचना आणि गाभाच ते बदलायला निघाले आहेत. मोदी-शहा म्हणतात, “महिलांना आरक्षण मिळावे म्हणून 850 जागांची लोकसभा तयार करत आहोत.” हे असत्य आहे. 2029 मध्ये सत्ता टिकवण्यासाठी त्यांना लोकसभेचे मतदारसंघ हवे तसे मनमानी पद्धतीने तोडायचे आहेत व लोकसभा मतदारसंघ भाजपधार्जिणे बनवून निवडणुका जिंकायच्या आहेत. त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी आसाममध्ये केलेच आहे. ईव्हीएम घोटाळा, व्होट चोरीनंतर ‘डिलिमिटेशन’च्या माध्यमातून निवडणुका ताब्यात घेण्याचा हा नवा प्रयोग आहे. तो यशस्वी होऊ नये. मोदींचा ‘विकसित भारत’ म्हणतात तो हाच आहे. आम्हाला हा असा भारत नको आहे, हे जनतेने एका बुलंद सुरात सांगायला हवे," असं राऊत लेखाच्या शेवटी म्हणालेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES