दारात डिलिव्हरी बॉयकडून पार्सल स्वीकारताना किचनमध्ये लागली आग अन्...; महिला डॉक्टरसोबत घडलेला विचित्र प्रकार CCTV मध्ये कैद
ज्या महिला डॉक्टरसोबत हे घडलं तिनेच तिच्या घरातील हा सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर केला असून नक्की काय झालं हे सांगितलं असून हा डिलिव्हरी बॉय मदतीसाठी कसा धावला याबद्दलचा तपशील सांगितलाय. तिने काय म्हटलंय जाणून घेऊयात...
आतापर्यंत तुम्ही अनेकदा डिलिव्हरी बॉयने एखाद्या महिलेची छेड काढली, चोरी केली, सामानात फेरफार केली यासारख्या बातम्या वाचल्या असतील. मात्र पंजाबमधील मोहाली येथील एका महिलेचा जीव एका डिलिव्हरी बॉयने वाचवल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या डिलिव्हरी बॉयने केवळ या महिलेचे प्राणच वाचवले असं नाही तर त्याने तिचं संपूर्ण घर जळण्यापासून वाचवलं असून हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या डिलिव्हरी बॉयने वेळीच प्रसंगावधान दाखवत पुढाकार घेतला नसता तर अनर्थ झाला असता. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...
डिलिव्हरी बॉय दारात उभा
डॉ. शिवांगी जोशी यांनी इन्स्टाग्रामवरुन एक सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे. हा व्हिडीओ त्यांच्याच घरातील सीसीटीव्हीमधला आहे. व्हिडीओमध्ये डॉ. शिवांगी पार्सल घेण्यासाठी घराच्या मुख्य दारात उभ्या असल्याचं दिसतंय. एकीकडे त्या डिलिव्हरी बॉयकडून तपशीलाचा देवाण-घेवाण करत असतानाच शेजारी असलेल्या ओपन किचनमध्ये आग लागली.
अचानक आग लागली
डॉ. शिवांगी जोशी यांनी सोशल मीडियावर हे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे, ज्यामध्ये डिलिव्हरी कर्मचाऱ्याची उल्लेखनीय प्रतिक्रिया पाहायला मिळते. व्हिडिओच्या सुरुवातीला डॉ. जोशी पार्सल घेण्यासाठी दरवाजाकडे जाताना दिसतात. काही क्षणांतच, स्वयंपाकघरातील गॅसवर ठेवलेल्या एका भांड्यातून धूर येऊ लागतो आणि अचानक आग भडकते. डॉ. शिवांगी आणि डिलिव्हरी बॉय या दोघांच्या नजरेत न येण्याऱ्या ठिकाणी ही आग लागली. गॅसवर ठेवलेल्या भांड्यातून आधी धूर निघाला आणि त्यानंतर अचानक या भांड्याच्या आजूबाजूला आग लागते.
काय करावं कळेना
आग लागल्यानंतर थोड्या वेळाने डिलिव्हरी बॉयकडून सामान घेऊन घरात परतल्यानंतर समोरचा प्रकार पाहिल्यावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डॉ. शिवांगी गोंधळून गेल्या. आग कशी विझवावी हे त्यांना सुचत नाही. त्याचवेळी दारात उभा असलेला डिलिव्हरी बॉय आता आला. पार्सल देऊन निघून जाण्याऐवजी, तो थेट स्वयंपाकघरात गेला. त्याने प्रसंगावधान दाखवत आग विझवण्यासाठी पुढे धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी त्याने जवळच पडलेलं एक जाड कापड आग लागलेल्या भांड्यावर टाकलं. त्यामुळे आगीला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला आणि आग विझली. लगेच या डिलिव्हरी बॉयने गॅसचा पुरवठाही बंद केला. डिलिव्हरी बॉयमुळे मोठा अनर्थ टळला.
त्यांनीच लिहिली भावूक पोस्ट
डॉ. शिवांगी यांनी या घटनेबद्दल इन्स्टाग्रामवर सविस्तरपणे लिहिलं आहे. "तो कर्मचारी एक पार्सल घेऊन आला होता, पण त्याला कल्पनाही नव्हती की तो माझ्या आयुष्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मला वाटलं नव्हतं. जेव्हा माझ्या स्वयंपाकघरात आग लागली, तेव्हा ती कशी विझवावी हे मला सुचत नव्हते. त्याने कोणताही विचार न करता आत येऊन मला मदत केली. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, माणुसकी अजूनही जिवंत आहे," असं डॉ. शिवांगी यांनी म्हटलं आहे. तसेच, "तो खऱ्या अर्थाने माझा तारणहार ठरला. त्याच्या या निस्वार्थी वृत्तीबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे," असंही शिवांगी यांनी या डिलिव्ही बॉयचे आभार मानले.
खरं तर त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी कदाचित शब्दही अपुरे पडतील, परंतु या कर्मचाऱ्याचे हे कृत्य कायम माझ्या स्मरणात कायम लक्षात राहील, असंही डॉ. शिवांगी यांनी म्हटलं आहे.