इंडिगोच्या विमानात पॉवरबँकमुळे आग लागल्याच्या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने 'MOBIKINS MK-PB-04' या विशिष्ट मॉडेलच्या पॉवरबँकवर भारतातून व भारतात येणाऱ्या किंवा देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांमध्ये पूर्णपणे बंदी घातली आहे.
भारतात येणाऱ्या किंवा भारतातून जाणाऱ्या तसेच देशांतर्गत उड्डाणांमध्ये प्रवासी किंवा विमान कंपन्यांना ही पॉवरबँक नेता अथवा वाहतूक करता येणार नाही. 'डीजीसीए'ने यासंदर्भात विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. 'डीजीसीए'चे महासंचालक वीर विक्रम यादव यांनी पॉवरबँकचे संबंधित मॉडेल विमानात नेण्यास तसेच मालवाहतुकीतून वाहून नेण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश दिले.
11 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये या मॉडेलच्या पॉवरबँकला लागलेल्या आगीमुळं हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले होते. त्यामुळं हा नियम करण्यात आला आहे.
प्रवाशांना ही पॉवरबँक प्रवासी स्वतःच्या बॅगेत (हँडबॅगेत किंवा चेक-इन बॅगेत) तसेच विमानातील कार्गो (Cargo) द्वारेही नेण्यास मनाई आहे. हा नियम फक्त 'MOBIKINS MK-PB-04' या विशिष्ट मॉडेलसाठी आहे; सर्व पॉवरबँकवर सरसकट बंदी नाही.
साधारणतः इतर पॉवरबँक फक्त हँडबॅगेत नेण्याची परवानगी आहे. चेक-इन बॅगेत ठेवण्यास मनाई असते.
फक्त केबिन बॅगेजमध्ये परवानगी: तुम्ही पॉवरबँक फक्त तुमच्यासोबत हातातील बॅगेत (Hand/Cabin Baggage) नेऊ शकता. ती चेक-इन सामानात (Checked-in Luggage) ठेवण्यास सक्त मनाई आहे.
प्रवासादरम्यान पॉवरबँकचा वापर करून मोबाईल किंवा इतर कोणतेही उपकरण चार्ज करण्यास पूर्णपणे बंदी आहे. तसेच विमानाच्या सीटवरील आउटलेटचा वापर करून स्वतः पॉवरबँक चार्ज करणेही प्रतिबंधित आहे.
क्षमता मर्यादा (Capacity Limit): साधारणपणे 100 Wh (वॅट-अवर) पेक्षा कमी क्षमता असलेल्या (सुमारे 27,000 mAh पर्यंतच्या) जास्तीत जास्त 2 पॉवरबँक नेण्याची परवानगी असते. त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी विमान कंपनीची पूर्वपरवानगी लागते.
ओव्हरहेड बिनमध्ये ठेवण्यास मनाई: पॉवरबँक विमानाच्या वरच्या सामानाच्या कप्प्यात न ठेवता ती स्वतःजवळ किंवा सीटच्या खिशात (Seat ठेवावी लागते, जेणेकरून काही समस्या झाल्यास त्वरित लक्ष जाईल.