बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झालीय. पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी त्यांनी केलीय. “पुन्हा एकदा फाळणी झाली पाहिजे,” असं विधान त्यांनी केलंय. पाकिस्तानातील सर्व हिंदूंना भारतात आणण्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथे आयोजित रामकथेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. याच कार्यक्रमात हिंदू एकजुटीपासून मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना भारताचं नागरिकत्व देण्याची मागणी केली. पाकिस्तानमधील हिंदूंना भारतात आणण्यासाठी पुन्हा एकदा फाळणी व्हावी, असंही ते म्हणाले.
याच भाषणात शास्त्री यांनी हिंदू समाजातील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केलं. सध्या सनातन धर्माला मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्या नावाने कलंक ठरणाऱ्या काही लोकांपासून अधिक धोका असल्याचं ते म्हणाले. हिंदूंनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.
हिंदूंमध्ये एकजूट टिकून राहावी यासाठी गरज पडल्यास आपण शंभर वेळा माफी मागण्यास तयार असल्याचं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. हिंदूंमध्ये फूट पडू नये, यासाठी अपमान सहन करण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं.
रामकथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा उपस्थित केला. अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आता मथुरेतही भव्य श्रीकृष्ण मंदिर उभारण्यासाठी हिंदूंनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. यासाठी लोकांनी मथुरेला येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली होती. धार्मिक कथांच्या आयोजनावरून केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी आपली रामकथा निवडणुकीसाठी नसून सनातन धर्मासाठी असल्याचं म्हटलं होतं. कुंडा येथे राजा भैया अर्थात रघुराज प्रताप सिंह यांच्या आयोजनात ही रामकथा सुरू आहे. यावेळी त्यांनी राजा भैया यांचं कौतुक करत प्रत्येक जिल्ह्यात एक राजा भैया असावा, असं विधानही केलं.