मोठी दुर्घटना! दुसऱ्या रेल्वेसाठी मार्ग मोकळा करत असतानाच एक्स्प्रेस पलटी; इंजिन आणि 5 डबे रुळावरुन घसरले! अनेक प्रवासी जखमी
कोलकाताहून मिझोरामला जाणाऱ्या प्रवासी रेल्वेचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले.
आसाममध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना झाली आहे. कोलकाता ते मिझोराम दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेचे पाच डबे आज रुळावरून घसरले आहेत. कोलकाता-सैरांग एक्सप्रेससोबत ही दुर्घटना झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी जखमी झाले असून, इतर सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ही दुर्घटना सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी आसाममधील दिगारू रेल्वे स्थानकाजवळ घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
रेल्वे प्रशासनाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रेल्वे दुसऱ्या गाडीला मार्ग देण्यासाठी थांबण्याचा प्रयत्न करत होती. मात्र लोको पायलट गाडीचा वेग नियंत्रित करू शकले नाहीत. यामुळे रेल्वेचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले.
रेल्वे प्रशासनानुसार, प्रवाशांना त्यांच्या संबधित ठिकाणांवर गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून, रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
दरम्यान रुग्णालयातील काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये जखमी प्रवासी त्यांच्या दुखापतींविषयी बोलताना दिसत आहेत. एका व्यक्तीच्या हातावर पट्टी बांधलेली होती, तर दुसऱ्या व्यक्तीवर मांडीवरील किरकोळ दुखापतीसाठी उपचार करण्यात आले.