भारत आणि भारतीयांची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा घसरण झाली आहे. 122 देशांमध्ये भारत शंभराव्या स्थानी आहे. भारताला मिळालेलं रँकिंग हे 'गंभीर भूक' श्रेणीमधील आहे. एकीकडे देशात आर्थिक प्रगती करत असल्याचा दावा विविध स्तरांवर केला जात असताना, दुसरीकडे ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सर्वच यंत्रणांनी तातडीने या भूक निर्देशांकासंदर्भातील घसरणीचा आणि त्या मागील कारणांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 2014 साली केंद्रामध्ये सत्तांतर झालं तेव्हा भारत 55 व्या स्थानी होता.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे...
'अन्नसुरक्षेशिवाय सुरक्षा नाही' हे यंदाचे सूत्र असले, तरी 2014 च्या तुलनेत विचार केला तर दरवर्षी भारताची स्थिती खालावत चालल्याचं दिसत आहे. जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, महागाई, अस्थिर हवामान, अन्नधान्याची उपलब्धता, पोषणविषयक असमानता ही भारताच्या घसरत्या रँकिंगमागील कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. मुलांमध्ये उंची आणि वजनाचं गुणोत्तराचं गणित बिघडलेलं असून उंचीच्या मानाने मुलांची वजनं कमी असल्याचं या अहवालात दिसून आलं असून ही सर्वात चिंताजनक बाब असल्याचं सांगितलं जात आहे.
दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या...
भूक निर्देशांकाचा विचार दोन पातळ्यांवर करणे आवश्यक असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. अन्नाची उपलब्धता नसणे, उपलब्ध अन्नाची पोषणमूल्ये आणि गुणवत्ता अपुरी असणे या कारणांवर विचार होणे गरजेचे असून केवळ धान्यपुरवठा हा अन्नसुरक्षेचा पूर्ण उपाय नाही, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. पुरेसा, पौष्टिक आणि स्थानिक गरजांशी सुसंगत आहार उपलब्ध होणे तितकेच आवश्यक असल्याचं लक्षात घेणं गरजेचं आहे.
त्या ठिकाणाचे पदार्थ द्यावेत अशी मागणी
देशातील अनेक भागांमध्ये आजही कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर आहे. यात महाराष्ट्रातील काही भागांचाही समावेश आहे. कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या असलेल्या भागांमध्ये पोषण योजनांच्या माध्यमातून मुलांना सक्तीने काही ठराविक पदार्थ आहारामध्ये देण्याऐवजी स्थानिक अन्नपदार्थांना प्राधान्य दिल्यास नक्कीच सकारात्मक फरक पडू शकतो असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. मुलांमधील कमी वजनाचे प्रमाण हे तीव्र कुपोषणाचे लक्षण मानले जाते. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास मुले वारंवार आजारी पडतात आणि त्यातून आरोग्यासंदर्भातील अधिक गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते.
2013 पासूनची कामगिरी
2013 मध्ये भारत 63 व्या स्थानी होता. त्यानंतर पुढील वर्षी यात सुधारणा होऊन भारताने 55 स्थानी झेप घेतली. मात्र पुन्हा 2015 पासून 2019 पर्यंत सलग चार वर्ष भारताचा क्रमांक घसरत गेला. 2015 मध्ये 80 व्या तर 2016 मध्ये 97 व्या क्रमांकापर्यंत भारताची घसरण झाली. 2017 मध्ये परिस्थिती अजून बिकट होऊन भारत 100 व्या स्थानी पोहोचला. त्यानंतर 2018 मध्ये भारत 103 व्या क्रमांकावर होता. 2019 मध्ये 102 व्या क्रमांकावर भारत होता. त्यानंतर 2020 मध्ये यात सुधारणा होऊन भारत 94 व्या स्थानी पोहोचला. 2021 मध्ये 101 वं स्थान, 2022 मध्ये 107 वं स्थान, 2023 मध्ये 111 वं स्थान, 2024 मध्ये 105 वं स्थान, 2025 मध्ये 102 व्या स्थानी भारत होता. यावर्षी भारत 100 व्या स्थानी आहे.