मध्य प्रदेश लोकयुक्तांनी व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्याशी संबंधित तीन ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यावेळी त्यांच्याकडे एकूण 7.6 कोटींची संपत्ती सापडली आहे. संजीव कुमार शर्मा हे पचमढी येथील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. अद्याप तपास सुरु असून संपत्तीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकयुक्तांकडे एक तक्रार आली होती, ज्यामध्ये संजीव कुमार शर्मा यांनी आपली पत्नी आणि इतर काही व्यक्तींच्या मदतीने त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक संपत्ती जमा केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीतून त्यांची मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 228 टक्के अधिक असल्याचं उघड झालं. त्यानंतर 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या'अंतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला.
कोर्टाने वॉरंट जारी केल्यानंतर लोकायुक्तांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. लोकायुक्तांच्या स्वतंत्र पथकांनी पचमढी येथील त्यांचे शासकीय निवासस्थान व कार्यालय, तसेच छिंदवाडा येथील त्यांचे खाजगी निवासस्थान येथे धाड टाकत शोध घेण्यास सुरुवात केली. भोपाळ विभागातील एका पथकाने ही कारवाई पूर्ण केली.
लोकायुक्तांच्या प्राथमिक माहितीनुसार, या शोधमोहिमेत 26 लाख 36 हजार 800 रुपये रोख रक्कम सापडली. याव्यतिरिक्त, सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचे 2.528 किलो सोने आणि सुमारे 2 लाख 94 हजार रुपये किमतीचे 1.656 किलो चांदीही जप्त करण्यात आली.
याशिवाय एक स्कॉर्पिओ, एक महिंद्रा केयूव्ही (KUV), एक रॉयल एनफिल्ड बुलेट आणि एक स्कूटर अशी चार वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांची एकत्रित किंमत सुमारे 31.2 लाख रुपये आहे. तसंच, संबंधित ठिकाणाहून सुमारे 50 लाख रुपये किमतीचे घरगुती साहित्यही सापडले आहे.
तपास पथकाला शर्मा यांच्याशी संबंधित इतर दोन मालमत्तांची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एक 'इकोटेल रिसॉर्ट' (Ecotel Resort) आहे, ज्याचे मूल्य सुमारे 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरी मालमत्ता 'सेरेनिटी द व्हिला' (Serenity the Villa) असून तिचे मूल्य सुमारे 1 कोटी रुपये आहे.
तपास पथकाने जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित 28 कागदपत्रे जप्त केली आहेत. हॉटेल आणि रिसॉर्टचे अधिकृत मूल्यमापन अद्याप झालेले नाही, त्यामुळे एकूण मालमत्तेचे मूल्य आणखी वाढू शकते.
लोकायुक्तांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तेचे प्राथमिक मूल्य सुमारे 7.6 कोटी रुपये आहे. हे मूल्य शर्मा यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा सुमारे 560 टक्के अधिक आहे. तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे की, हा आकडा केवळ प्राथमिक स्वरूपाचा आहे. जमिनीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यावर आणि हॉटेल व रिसॉर्टचे अधिकृत मूल्यमापन झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल. सध्या शोधमोहीम सुरू असून, लोकायुक्त पथक इतर ठिकाणांवरही छापे टाकू शकते.