निवडणुकांआधी पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार, दर महागणार? दिवाळीत...
नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता आहे. एका अहवालात याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
देशात महागाईचा भडका उडालेला असतानाच सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशातील महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याआधी नोव्हेंबर दरम्यान सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप तेल कंपन्या आणि केंद्र सरकारकडून कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.
उत्तर प्रदेश, पंजाबसह प्रमुख सात राज्यांमध्ये मार्च ते मे दरम्यान मतदान होणार आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा बदल इंधनाचे दर वाढवण्यासाठी सरकारसमोर शेवटच्या व्यावहारिक संधींपैकी असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अहवालानुसार, नोव्हेंबरमध्ये इंधनाच्या किमतीत 3.75 टक्क्यांची वाढ होऊ शकते. मे महिन्यात झालेल्या एकूण 7.5 टक्के दरवाढीच्या तुलनेत ही वाढ निम्मी असणार आहे. मात्र ही संभाव्य वाढ असून प्रत्यक्षात इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर किती रुपयांनी दर वाढतील हे मात्र अद्याप समोर आले आहे.
डिझेलचा तुटवडा
डिझेलचा प्रचंड तुटवडा आहे. यामुळे दिवाळीनंतर डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. डिझेलचा तुटवडा हा आगामी 2027 पर्यंत असाच कायम राहण्याची भीती 'इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी'ने दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या आपल्या 'ऑइल मार्केट रिपोर्ट' मधून वर्तवली आहे.
'आयईए' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार, वर्षाच्या ज्या काळात डिझेलची मोठी साठवणूक होणे अपेक्षित असते. त्याच काळात डिझेलचा साठा वेगाने कमी होत चालला आहे. यामुळे दिवाळीनंतर डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील स्टोरेज टॅक्स आणि रिफायनरी साठे वेगाने कमी होत आहेत.
पेट्रोलवरील निर्यात शुल्कात 5 पट वाढ
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधनाच्या निर्यातीवरील करात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. देशात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि स्थानिक बाजारपेठेत पुरवठा सुरळित राहावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क थेट 5 पटीने वाढवले आहे.