शनिवारी सकाळी ग्रेटर नोएडा येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. पाचही जणांचा एकत्र संशयास्पद मृत्यू झाला होता. यात पती-पत्नी आणि तीन मुलांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जण रात्री जत्रेत गेले होते. तेव्हा जत्रेतून परत येताना त्यांनी नूडल्स खाल्ले होते. त्यानंतरच सगळ्यांचा मृत्यू झाला. मात्र, या पाचही जणांना विष देण्यात आले होते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतांची ओळख महेश, त्याची पत्नी ललिता, 11 वर्षांचा मुलगा लड्डू, 7 वर्षांची मुलगी मिष्टी आणि 3 वर्षांची मुलगा साक्षात अशी पटली आहे.
महेशच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि मुलांव्यतिरिक्त त्याची आईदेखील सोबत राहत होती. महेशच्या कुटुंबाचा संशयास्पद अंत झाल्यानंतर त्याच्या आईवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला असून महेशची वहिनीने केलेला खुलासा अत्यंत हादरवणारा आहे.
महेशची वहिनी नीरज बुलंदशहरमध्ये खुर्जा येथे राहते. तिने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या पतीचे आधीच निधन झाले आहे. त्यानंतर मला घराबाहेर काढण्यात आले. महेश माझा दीर होता. तो नेहमी मला सांगायला की संयम ठेव ही देखील वेळ निघून जाईल आणि आपण पुन्हा एकत्र राहू.
नीरजने पुढे म्हटलं की, तिच्या सासूबाई चंद्रवतीला संपत्ती तिच्या मुलींना द्यायची होती. दिल्लीचे घर मोठ्या मुलीला आणि रबुपुरा येथील घर लहान मुलींच्या नावावर केलं होतं. माझा दीर आणि जाऊ दोघंही चांगले होते. आम्हाला एकत्र राहायचं होतं. पण माझ्या सासूला आम्हाला एकत्र राहू द्यायचं नव्हतं.
तिने पुढं म्हटलं की, इतकी मोठी घटना घडली पण दोन्ही मुलींपैकी कोणीच इथे पोहोचलं नाही. जसे हे लोक मरण पावले आहेत, त्याचप्रमाणे त्या लोकांनाही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून बराच काळ वाद सुरू होता, असाही दावा तिने केला आहे.
महेशची वहिनी नीरज हिने पुढे सांगितले की, जमिनीच्या वादामुळे कुटुंबात ताण होता. चंद्रावतीनेच हा संपूर्ण प्रकार घडवून आणला. मात्र, पोलीस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस तपासानंतरच पाच जणांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत, ज्यामुळे मृत्यूच्या कारणावर स्पष्टता येईल.