भीषण रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू; पती-पत्नीमधील भांडण ठरलं कारण!
राजस्थानच्या बिकानेरमध्ये दाम्पत्याला वाचवण्यासाठी रेल्वे रुळांवर गेलेल्या दोन व्यक्तींनाही ट्रेनने धडक दिली. पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला.
नवरा-बायकोत भांडण कधी ना कधी होत असतं. पण यामुळे भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू होऊ शकतो याचा विचारही कोणी करु शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. दिवाळीच्या दिवशी राजस्थानमधील बिकानेर येथे एक हृदयद्रावक रेल्वे दुर्घटना घडली. रेल्वे रुळांवर वाद घालत असलेल्या दाम्पत्याला वाचवण्यासाठी दोन व्यक्तींनी धाव घेतली. मात्र, त्याच वेळी भरधाव ट्रेन आल्याने चौघेही त्या ट्रेनच्या धडकेत सापडले. या दुर्घटनेत पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
घडसीसर रेल्वे ट्रॅकवर दुपारी भीषण दुर्घटना
बिकानेरमधील घडसीसर रेल्वे ट्रॅकवर दुपारी साधारण 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा परिसर जय नारायण व्यास कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे रुळांजवळ असलेल्या शेतात काम करणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद सुरू असतानाच दोघे रेल्वे रुळांच्या दिशेने गेले. त्यानंतर काही क्षणांतच हा प्रकार भीषण दुर्घटनेत बदलला.
दाम्पत्याला वाचवण्याचा दोघांचा प्रयत्न
रेल्वे रुळांवर नवरा-बायको धोकादायक परिस्थितीत असल्याचे पाहून जवळ असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दोघेही मदतीसाठी रुळांवर पोहोचले. मात्र त्याच वेळी ट्रेन येत असल्याने चौघांनाही सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळाली नाही. ट्रेनची धडक बसल्याने दाम्पत्य आणि मदतीसाठी गेलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला. दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली.
एका मृत व्यक्तीची ओळख पटली
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी एकाची ओळख संजीत मोची अशी पटली आहे. तो बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत दाम्पत्याची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. जखमी व्यक्तीची ओळख अमरचंद सांखला अशी असून, तो बिकानेरमधील राणीबाजार परिसरातील रहिवासी असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलंय. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जीआरपी आणि स्थानिक पोलिसांकडून तपास
अपघातानंतर ट्रेन घटनास्थळी थांबवण्यात आली. माहिती मिळताच सरकारी रेल्वे पोलीस म्हणजेच जीआरपी आणि स्थानिक पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी मदतकार्य केले.
दाम्पत्य रेल्वे रुळांवर कसे पोहोचले?
दाम्पत्यामध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला होता, ते रेल्वे रुळांवर कसे पोहोचले आणि त्यानंतर मदतीसाठी गेलेल्या व्यक्तींना ट्रेनचा अंदाज का आला नाही, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या समोर आलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून या दुर्घटनेमागील नेमका घटनाक्रम आणि सर्व मृतांची ओळख अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.