तुम्ही चहा, नाश्ता, भाजीपाला किंवा रिक्षाचे भाडे देण्यासाठी दररोज यूपीआय वापरत असाल आणि तुमचे बँक खाते एचडीएफसी बँकेत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नव्या वर्षापासून बँकेच्या यूपीआय व्यवहारांशी संबंधित एसएमएस अलर्टच्या सुविधेत बदल होणार आहे. 1 जानेवारी 2027 पासून 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी बँक ग्राहकांना एसएमएस पाठवणार नाही. काय आहे नवा नियम? याचा तुमच्यावर काय परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजनुसार, 1 जानेवारी 2027 पासून 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट पाठवले जाणार नाहीत. सध्या ग्राहकांना अगदी 10,50 किंवा 100 रुपयांच्या पेमेंटनंतरही बँकेकडून एसएमएस मिळतो. नव्या नियमानंतर अशा छोट्या व्यवहारांसाठी मोबाईलवर मेसेज येणार नाही. 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट सुरू राहतील.
एसएमएस सुविधा बंद झाली तरी ग्राहकांना व्यवहारांची माहिती मिळण्याचा पर्याय उपलब्ध असेल. एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व यूपीआय व्यवहारांचे ईमेल अलर्ट सुरू राहतील. म्हणजेच 500 रुपयांपेक्षा कमी किंवा जास्त रकमेचा व्यवहार केला, तरी त्याची माहिती नोंदणीकृत ईमेलवर मिळू शकेल. या ईमेल अलर्टसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे बँकेकडे योग्य आणि सक्रिय ईमेल पत्ता नोंदवलेला असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या बदलामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांबाबतचे निर्देश आहेत. आरबीआयच्या नियमांनुसार, 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी बँकांनी तातडीने एसएमएसअलर्ट पाठवणे बंधनकारक आहे. 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांसाठी एसएमएस पाठवायचा की नाही, हे बँक आपल्या अंतर्गत धोरणानुसार ठरवू शकते.
नव्या बदलाचा परिणाम होऊ नये म्हणून एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी आपल्या खात्याशी जोडलेला ईमेल पत्ता तपासावा. जुना ईमेल बंद असेल किंवा पत्ता बदलला असेल, तर बँकेच्या अधिकृत मोबाइल ॲप, नेटबँकिंग किंवा शाखेच्या माध्यमातून संपर्क तपशील अपडेट करावेत. ईमेलमधील स्पॅम किंवा प्रमोशन फोल्डरही तपासण्याची सवय ठेवावी. विशेष म्हणजे, ईमेल अपडेट करण्यासाठी अनोळखी एसएमएस किंवा व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन करण्यात आलंय.
1 जानेवारी 2027 नंतर 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेचा यूपीआय व्यवहार केल्यानंतर एसएमएस आला नाही, तर घाबरून जाण्याची गरज नाही. एसएमएस न येणे म्हणजे ट्रान्झाक्शन फेल झाले, असा त्याचा अर्थ होत नाही. व्यवहाराची स्थिती तपासण्यासाठी संबंधित यूपीआय ॲपमधील ट्रान्झाक्शन हिस्ट्री, बँक खात्याचे स्टेटमेंट किंवा नोंदणीकृत ईमेल तपासा. एखादे ट्रान्झाक्शन फेल झाले की खात्री केल्याशिवाय पुन्हा पैसे पाठवू नका. यामुळे एकाच व्यवहारासाठी दोनदा पैसे जाण्याचा धोका टाळता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.