रेल्वे लवकरच घेणार मोठा निर्णय? तिकीटाबाबतची 'ती' सुविधा बंद होणार, 'कन्फर्म' तिकीट...
रेल्वे लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तिकीट आरक्षणाबाबत लवकरच ती सुविधा सुरू होणार आहे.
रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. रेल्वेचे आरएसी तिकीट रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन आरक्षण बंद होण्याची शक्यता आहे. आरएसी बंद झाल्यानंतर एकतर तिकीट कन्फर्म होईल नाहीतर कॅन्सल होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून अनेक वर्षापासून सुरू असलेली ही सुविधा बंद करण्याच्या प्रस्तावावर सध्या विचार सुरु आहे.
संसदीय समितीच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना 'कन्फर्म' आणि 'कॅन्सल' हे दोनच पर्याय उपलब्ध असणार आहेत.
आरएसी म्हणजे कायय़
'आरएसी' व्यवस्थेत दोन प्रवाशांना एकाच 'साइड लोअर बर्थ'वर जागा दिली जाते. त्यांच्याकडून पूर्ण तिकीटदर आकारला जातो. त्यामुळे अर्ध्या बर्थसाठी पूर्ण भाडे का, असा प्रश्न उपस्थित होत होता. संसदीय समितीनेही या व्यवस्थेचा फेरविचार करण्याची शिफारस केली. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन सध्याच्या 'आरएसी' व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे.
आरएसी सीटमुळं अनेकदा प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. एकाच बर्थवर महिला आणि प्रवाशांना जागा दिली जाते. त्यामुळं अनेकदा अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं त्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करणे तिकीट तपासनीसांनाही कठीण जाते. त्यामुळं या व्यवस्थेचा पुर्नविचार करण्यात येत आहे.
आरएसीमध्ये दोन प्रवाशांना एकाच बर्थवर जागा दिली जाते. मात्र त्यापैकी एका प्रवाशाने तिकीट रद्द केल्यानंतर दुसऱ्या प्रवाशाला पूर्ण बर्थ मिळण्याची शक्यता असते. त्यामुळं तिकीट रद्द झाल्यानंतर पूर्ण सीट त्या प्रवाशांची असते. आता रेल्वेच्या आरक्षण व्यवस्थेत मोठे बदल झाले असताना आरएसी व्यवस्थेची खरंच गरज आहे का? यावर रेल्वेकडून विचार सुरू आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून आरएसी व्यवस्थेचे भवितव्य आणि त्यात करता येणाऱ्या सुधारणांचा विचार केला जात आहे. मात्र आरएसी व्यवस्था पूर्णपणे बंद करायची की तिच्या नियमांमध्ये बदल करायचा, याबाबत अद्यात निर्णय घेण्यात आला नाहीये.